ब्रिटीशांनी कोहीनूरच नाही तर सांगलीच्या बाळु लोखंडेंची खुर्ची पण चोरली
लोखंडे यांनी कर्नाटकातून या खुर्च्या घेतल्या होत्या
लोकवार्ता । प्रतिनिधी
लंडन : सध्याच्या सोशल मिडीयाच्या जमान्यात आश्चर्य वाटावे अशा घटना समोर येत असतात. शनिवारी अशीच एक रहस्यमयी घटना समोर आली. क्रिकेट समालोचक सुनंदन लेले सध्या ब्रिटनमध्ये आहेत. मॅंचेस्टरमध्ये फिरत असताना एका रेस्टॉरंटमध्ये एक खुर्ची दिसली. प्लॅस्टीकच्या खुर्च्या येण्याच्या आधी अशा लोखंडी खुर्च्या सर्रास वापरात होत्या. त्या खुर्चीच्या मागच्या बाजूला बाळू लोखंडे सावळज अशी मराठीतील अक्षरे वाचून लेले थबकले आणि त्याचा व्हीडीओ काढून त्यांनी सोशल मिडीयात टाकला
तासगाव तालुक्यातील सावळज येथील बाळू लोखंडेच्या माया मंडप डेकोरेटर्समधील ही लोखंडी खुर्ची चक्क मँचेस्टरच्या एका रेस्टॉरंट बाहेर आढळल्याच्या हा व्हीडीओ महाराष्ट्रात सोशल मिडीयात प्रचंड व्हायरल झाला. संध्याकाळ होताहोता काही माध्यमांनी बाळू लोखंडेंना गाठले. तेंव्हा कळले की, ही १३ किलो वजनाची इतकी जड खुर्ची बाळू लोखंडे यांनी पंधरा वर्षापूर्वीच भंगारमध्ये विकली होती.
आता या पंधरा वर्षात ही लोखंडी खुर्ची थेट मॅंचेस्टर मध्य पोहचल्याने बाळू लोखंडेना देखील आश्चर्याचा धक्का बसला. सावळजचे मंडपवाले बाळू लोखंडेंची खुर्ची थेट मॅंचेस्टरमध्ये पोहचल्याची बातमी महाराष्ट्रात दिवसभरात वाऱ्यासारखी पसरली आणि त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बाळू लोखंडे यांचा तासगाव तालुक्यातील सावळज मध्ये माया मंडप डेकोरेटर्स या नावाचा व्यवसाय आहे. वस्तू गहाळ होऊ नये म्हणून मंडपवाले आपल्या सर्व वस्तूवर वॉर्निशने नाव टाकत असतात. तसेच नाव बाळु लोखंडे यांनी या खुर्चीवर टाकले होते. बाळू लोखंडेंची ही खुर्ची लंडनमध्ये पोहचली असली तरी त्यावर पांढऱ्या वॉर्निशने लिहिलेले.
बाळु लोखंडेंची ही खुर्ची व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सुमिक राघवन यांनीही या खुर्चीवर भन्नाट टीप्पण्णी केलीय. अरे देवा ब्रिटीशांनी कोहीनुरच नाही, तर खुर्च्या पण चोरल्या अहो लेले सर आत मध्ये बघायचे ना सतरंज्या पण असतील मंडपातल्या. असे राघवन यांनी म्हटले आहे.
बाळू लोखंडांचा मंडप डेकोरेटरचा व्यवसाय आहे. हे व्यावसायिक आपल्या मंडप डेकोरेटर्स मधील सर्व वस्तूंवर नावे टाकत असतात. बाळू लोखंडे यांनीही आपल्या सर्व वस्तूवर नाव टाकले ज्यात त्यावेळी या लोखंडी खुर्चीचा देखील समावेश होता. मात्र, या लोखंडी खुर्ची १३ किलो इतक्या वजनाच्या असल्याने पंधरा एक वर्षापूर्वी लोखंडे यांनी या लोखंडी खुर्ची भंगारमध्ये विकून प्लास्टिकच्या खुर्च्या घेतल्या. मात्र, या लोखंडी खुर्ची मधील एक खुर्ची चक्क मँचेस्टरपर्यंत कशा पोहोचल्या याचे नवलच आहे. बाळू लोखंडे यांनी १५ वर्षांपूर्वी भंगारात विकलेली खुर्ची मँचेस्टरमध्ये एका रेस्टॉरंट बाहेर सुस्थितीत असल्याचं पाहून त्यांना समाधान वाटल्याची भावना व्यक्त केलीय. या खुर्चीमुळे मला माझ्या जुन्या व्यवसायातील साहित्याची आठवण आली असे बाळू लोखंडे यांनी म्हटलंय.
१० रुपये किलोने विकल्या खुर्च्या
लोखंडे यांनी कर्नाटकातून या खुर्च्या घेतल्या होत्या. एका खुर्चीचे वजन १३ किलो आहे. या खुर्च्या हाताळण्यासाठी अवघड असल्याने त्यांनी त्या मुंबईतील एका भंगाल व्यावसायिकाला विकल्या. तिथून या मजबूत खुर्च्या ऍन्टिक पीस म्हणून कदाचित ऑनलाईन विक्री करून लंडनमध्ये पोहचल्या असतील. सुनंदन लेले यांनी लोखंडे यांच्याशी फोनवर संपर्क साधून माहिती घेतली आहे.