आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार!
मुंबई।लोकवार्ता-
महाराष्ट्राला अंडर २ कोलिशन फॉर क्लायमेट अॅक्शनकडून प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व पुरस्कार मिळाला आहे.राज्यासाठी आनंदाची बाब म्हणजे स्कॉटलंडमध्ये अंडर २ कोलिशन फॉर क्लायमेट अॅक्शनतर्फे तीन पुरस्कारांपैकी एक जिंकणारे भारतातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे. राज्याच्या वतीने महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
“हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारतामध्ये महाराष्ट्राला पुढाकार घ्यायचा आहे. मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) हे उत्कट वन्यजीव प्रेमी आणि संवर्धनवादी आहेत आणि त्यांनी आम्हाला चांगल्या भविष्याची, हरित भविष्याची स्वप्ने पाहण्याची संधी दिली आहे. माय प्लॅनेट नावाची चळवळ आम्ही सुरू केली आहे. आम्ही निसर्गाच्या पारंपारिक पाच घटकांवर लक्ष केंद्रित करत आहोत,” अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ग्लासगो येथे दिली.
“नुकतेच आम्ही एका महामार्गाचे सोलराइजेशन केले आहे आणि आम्ही २५० मेगावॅट ऊर्जा निर्माण करणार आहोत. आम्ही निविदा कागदपत्रे सादर केली आहेत आणि आम्ही मुंबई आणि नागपूर दरम्यानच्या नवीन महामार्गावरून २५० मेगावॅट सौरऊर्जा निर्माण करणार आहोत,” असे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. “स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership साठी पुरस्कार मिळाला. आपल्या Climate Partnerships & Creative Climate Solutions ची येथे विशेष दखल घेतली. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो. शाश्वत भविष्यासाठी जगभरात क्लायमेट ग्रुप स्थानिक शासकीय संस्थांसह कार्यरत आहेत आणि त्यांच्यासह विविध उपाययोजनांवर आम्ही काम करणार आहोत.
“महाराष्ट्राच्या या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाल्याचे समाधान आहे” -पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे