“पाऊसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान”
-आल्हाट वस्ती मोशी येथे मुसळधार पाऊसामुळे ज्वारी पिकाला बसला फटका.
मोशी ।लोकवार्ता-
बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मोशी, चिखली, चोली, डुडुळगाव, आळंदी परिसरातील नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
बुधवारी सकाळपासूनच हवेमध्ये गारवा जाणवत होता तसेच पावसाचीही संततधार सुरू होती. मात्र सायंकाळी ७ पासून रात्री उशिरापर्यंत मोशी, चिखली, मोशी-चिखली प्राधिकरण, चन्होली, डुडुळगाव, आळंदी आदी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने या परिसरातील शेतांमधील ज्वारी, बाजरी, टोमॅटो, कोबी, वांगी या पिकांमध्ये पाणी साचले. तर ज्वारीचे पीक भुईसपाट झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे कृषिमित्र राजू आल्हाट यांनी सांगितले.

मोशी गावठाण, चिखली,जाधववाडी, देहू-आळंदी बीआरटीएस मार्ग, पुणे नाशिक महामार्ग, बोराटे वस्ती, लिंक रस्ता, स्पाईन रस्ता, चोली, डुडुळगाव, आळंदी आदी भागांतील अनेक रस्त्यांवरील सखल भागांमध्ये पाणी साचल्याने पायी चालणारे नागरिक व वाहनचालकांनाये-जा करणे अवघड झाले होते. कार्तिकी वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांच्या तंबूंमध्ये पाणी शिरल्याने त्यांना निवासी धर्मशाळांमध्ये आश्रय घ्यावा लागला. तर वारकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. रात्री उशिरा पाऊस उघडल्यावर जनजीवन सुरळीत झाले.