तब्बल १४ वर्षानंतर काडीपेटीच्या किमतीत होणार वाढ !
काडीपेटी कंपनी मेंबर्स ने एकत्रित येऊन घेतला निर्णय
मुंबई २३ ऑक्टोबर लोकवार्ता
गुरुवारी शिवकाशी मध्ये ऑलइंडिया चेंबर ऑफ माचीसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
देशात सध्या इंधन, गॅस, खाद्यतेलापासून भाजीपाल्यापर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती वाढताना दिसत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक चिंतेत असतानाच आता यामध्ये भर घालणारी आणखी एक बातमी समोर आली आहे.14 वर्षात पहिल्यांदाच काडीपेटीच्या किंमतीत वाढ होणार आहे. त्यामुळे आता काडीपेटीसाठी 2 रुपये मोजावे लागतील. काडीपेटी तयार करणाऱ्या कंपन्यांनी एकत्रपणे हा निर्णय घेतला. यापूर्वी 2007 मध्ये काडीपेटीच्या दरात बदल झाला होता. त्यावेळी त्याची किंमत 50 पैशांनी वाढवून 1 रुपये करण्यात आली होती. आता नवीन दर 1 डिसेंबरपासून लागू होईल.

अलीकडच्या काळात कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे काडीपेटीच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उद्योग क्षेत्रातील लोकांचे म्हणणे आहे. काडीपेटी तयार करण्यासाठी 14 वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या मालाची गरज असते. यातील अनेक घटक असे आहेत की त्यांची किंमत दुप्पट झाली आहे.