“महापौर आणि उपमहापौर यांचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा”
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी वल्लभनगर आगारास भेट देऊन एसटी कर्मचाऱ्यांना दिला पाठिंबा.
पिंपरी। लोकवार्ता-
संपूर्ण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्याला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा राज्यव्यापी संप सुरु असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी वल्लभनगर आगारास भेट देऊन एस टी कर्मचा-यांच्या व्यथा जाणून घेत आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला.

एस. टी. कर्मचा-यांना मिळणारे तुटपुंजे वेतन, भत्ते, अपु-या सोयी-सुविधा तसेच ड्युटीवर असताना मुक्कामाच्या ठिकाणी मुलभूत सोयी सुविधांचा अभाव व त्यामुळे होणारी गैरसोय इत्यादी विविध अडीअडचणी, समस्या मांडत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण होण्याची गरज आंदोलनकर्त्यांनी महापौर माई ढोरे यांचेकडे व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाने देखील एस टी कर्मचा-यांच्या विविध मागण्यांचा सहानभूतीपूर्वक विचार करुन कर्मचा-यांना भेडसावणा-या समस्या अडअडचणी सोडवून मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी आंदोलनस्थळी उपमहापौर सौ.हिराबाई उर्फ नानी घुले देखील उपस्थित होत्या. तसेच महाराष्ट्रातील लालपरीचे ग्रहण लवकरात लवकर सुटून सर्वसामान्य प्रवाशांची वाहतूकीची होणारी अडचण लक्षात घेता राज्यामधील रस्त्यांवर लवकरात लवकर एस. टी. वाहतूक सुरळीत चालू होणे आवश्यक आहे असे महापौर सौ.उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले.
