महापौर माई ढोरे शासकीय वाहन जमा करत दुचाकीवरून परतल्या घरी
-पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे महापौर माई ढोरे यांनी आपले शासकीय वाहन जमा केले.
पिंपरी | लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड महानपालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यानंतर महापालिका पदाधिकारी त्यांची वाहने जमा करतात. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये महापौर पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे महापौर माई ढोरे यांनी आपले शासकीय वाहन जमा केले. महापालिकेत महापौरपदाचे वाहन जमा केल्यानंतर त्यांनी दुचाकीवरून आपल्या घरी गेल्या. पिंपरी चिंचवड महापालिका सभागृहाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आजपासून महापालिकेचा कारभार प्रशासक पाहणार आहे. आयुक्त राजेश पाटील प्रशासक म्हणून आता पालिकेचे प्रमुख असणार आहेत. महानगरपालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ 13 तारखेला संपुष्टात आला असून आता प्रत्येकजण निवडणूक लागणार कधी याची वाट पाहत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी महिन्यामध्ये होणे अपेक्षित होते. मात्र ओबीसी आरक्षणाचा पेच आणि प्रभागरचनेची लांबलेली प्रक्रिया यामुळे निवडणूक पुढे गेली. त्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये निवडणूक होणार होती. मात्र ओबीसींशिवाय निवडणूका होऊ नयेत ही भूमिका सरकारसह विरोधकांनीही घेतली. दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांसाठी प्रारूप प्रभागरचना, त्यावरील हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करत अंतिम प्रभागरचना जाहीर करण्याची तयारी केली होती. मात्र असे असतानाच राज्य सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुरुस्ती विधेयक संमत केले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत हे विधेयक एकमताने मंजूर झाले. त्यामुळे आयोगाने आता अंतिम प्रभागरचना जाहीर करण्याऐवजी वेट अँड वॉचची भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे.