“यांत्रिकी सफाईचे सत्ताधाऱ्यांना वावडे”
पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याचा प्रस्ताव सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा तहकूब ठेवला.
पिंपरी | लोकवार्ता
पालिकेमार्फत शहरातील रस्ते साफसफाईचे कामकाज यांत्रिकी पद्धतीने करण्यात येते. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातून डी. एम. एंटरप्रायजेस आणि बीव्हीजी इंडिया या दोन संस्थांना एक डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१७ अशा दोन वर्षे कालावधीसाठी कामकाज सोपविण्यात आले होते. हा कालावधी संपुष्टात आल्यानंतर दोन्ही संस्थांना मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपुष्टात आल्यानंतर पुन्हा चार महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली.
वारंवार मुदतवाढ दिल्यानंतर २०२० मध्ये शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या कामकाजासाठी पॅकेजनिहाय दर मागविण्यात आले; तथापि, निविदा प्रक्रिमध्ये तांत्रिक त्रुटी राहिल्याच्या कारणास्तव सहा जुलै २०२० रोजी निविदा रद्द करण्यात आली. स्थायी समितीने सप्टेंबर २०१८ मध्ये शहरातील मंडई, रस्ते आणि इतर मोकळ्या जागा यांत्रिकी पद्धतीने साफसफाईच्या कामासाठी ‘आरएफपी’ तयार करण्यासाठी टंडन अर्बन सोल्यूशन यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली होती.

शहरातील १८ मीटर व त्यापेक्षा मोठ्या रस्त्यांची साफसफाई यांत्रिकी पद्धतीने करण्यासाठी ‘टंडन अर्बन’ने तयार केलेला मसुदा सात जानेवारी २०२१ रोजी सादर करण्यात आला. त्यानंतर तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमक्ष सादरीकरण करण्यात आले. यात दुरुस्ती करण्याच्या सूचना सल्लागार संस्थेला देण्यात आल्या.
संबंधित संस्थेने १९ जानेवारी २०२१ रोजी सुधारित मसुदा सादर करण्यात आला. त्यानुसार १८ मीटरपेक्षा मोठ्या रस्त्यांची चार भागात विभागणी करण्यात आली. त्यामध्ये महापालिका मुख्यालयाच्या दक्षिण बाजूसाठी दोन पॅकेज आणि उत्तर बाजूसाठी दोन पॅकेज निश्चित करण्यात आली. पॅकेज एकसाठी २२१.६८ किलोमीटर, पॅकेज दोनसाठी २३६.२ किलोमीटर, पॅकेज तीनसाठी २३९.८६ किलोमीटर आणि पॅकेज चारसाठी २३०.६९ किलोमीटर रस्त्याची लांबी निश्चित करण्यात आली. त्यामुळे शहरातील एकत्रित रस्त्यांची अंदाजित लांबी ९२८.२५ किलोमीटर गृहित धरण्यात आली.