मोशीतील सोसायटीला टँकरच्या पाण्यासाठी लाखोंचा भुर्दंड
पावसाळ्यातही महापालिकेकडून नियमित पाणीपुरवठा होत नाही.

लोकवार्ता । प्रतिनिधी
चऱ्होलीतील प्रभाग तीनमधील शिवाजीवाडी परिसरातील साई हिरा क्लासिक सोसायटीला ऐन पावसाळ्यातही महापालिकेकडून नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे दररोज टैंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना लाखोंचा भुर्दंड पडत आहे.

शिवाजीवाडी येथील साई हिरा क्लासिक सोयायटीतील रहिवाशांनी तीन वर्षांपूर्वी सदनिकांचा ताबा घेतला. तेव्हापासून पाण्याची समस्या कायम आहे. दररोज साधारण पाच टैंकर सोसायटीला मागवावे लागतात. त्यासाठी महिन्याला ६० हजार याप्रमाणे वर्षाला सात ते साडेसात लाख रुपयांचा भुर्दंड हिवाशांना सहन करावा लागतो. याबाबत गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता. महापालिकेत समावेश झाल्यानंतर चऱ्होली भागातील गृहनिर्माण सोसायट्यांना अनियमित पाणीपुरवठा होत आहे.
कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे साई हिरा क्लासिक सोसायटीतील सदस्यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची बुधवारी भेट दिली. चऱ्होली परिसरातील सोसायटींना तातडीने सुरळीत व नियमित पाणीपुरवठा करावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शिष्टमंडळाने दिला. या वेळी गोरखनाथ जगदाळे, महेश घनवट श्रीकांत शिंदे, नारायण बांगर, विराज कर्णे, निलेश थोरात, विकास पवार आदी.उपस्थित होते.