सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आमदार महेश लांडगे यांची पहिली प्रतिक्रिया
-निवडणुकांसाठी भाजपचे कार्यकर्ते सज्ज; निवडणुकांच्या तयारी सुरु.
पिंपरी । लोकवार्ता-
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजप आमदार महेश लांडगे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे . भारतीय जनता पार्टी चे उमेदवार , कार्यकर्ते निवडणुकीसाठी कायम सज्ज असतात. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये ‘अब की बार १०० पार हा आमचा निर्धार आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करीत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आठवडाभरात जाहीर करा, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाला बुधवारी दिला. त्यामुळे महापालिका निवडणुका होणार की पुढे जाणार? याबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

महाविकास आघाडीला टोला
राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, ही आमची मागणी होती. यापुढील काळातही राहणार आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे केवळ वेळकाढूपणा केला. ओबीसी आरक्षणाबाबत ट्रिपल टेस्ट करण्यात आली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानेच आता राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत महाविकास आघाडीच्या हलगर्जीपणामुळे ओबीसी समाजाची मोठी हानी झाली आहे. मात्र, भाजपा ओबीसी समाजाला न्याय मिळवणून देण्यासाठी कायम आग्रही राहणार आहे, असेही आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.
भाजपची मोर्चेबांधणी
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. शहरात एकूण ६ मंडल आहेत. मंडल पदाधिकाऱ्यांची संख्या ५५० इतकी आहे. जिल्हा कार्यकारिणी १५० पदाधिकाऱ्यांची आहे. शहरात एकूण ३५३ शक्तीकेंद्र प्रमुख कार्यरत आहेत. अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे १ हजार ३०८ इतके बूथप्रमुख कार्यरत आहेत. आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सोबत आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणुकीत निश्चितपणे यशस्वी होणार आहोत, असा दावाही आमदार लांडगे यांनी केला आहे.