आमदार महेश लांडगेंची मानवता : संपकरी एसटी कामगारांच्या घरचे भरले ‘राशन’
-किमान १५ दिवस पुरेल इतके अन्नधान्य किटचे वाटप
– वल्लभनगर, शिवाजीनगर एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांना मदत
पिंपरी|लोकवार्ता-
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावे. या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद सुरू केला आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी मानवतेचे दर्शन घडवत तब्बल ५०० हून अधिक कामगारांच्या कुटुंबियांना किमान १५ दिवस पुरेल इतके अन्नधान्य किट वाटप केले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात एसटी कर्मचाऱ्यांनी दि.४ नोव्हेंबरपासून बेमुदत बंद पुकारला आहे. मुंबईतील आझाद मैदानात एसटी कामगार प्रतिनिधी आंदोलनाला बसले आहेत. गेले १५ दिवस काम बंद असल्यामुळे एसटी कामगार कुटुंबियांच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे.

दरम्यान, वल्लभनगर आणि शिवाजीनगर आगारातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार लांडगे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती. तसेच, कामगारांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. तसेच, विधान परिषदेचे आमदार गोपिचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाउ खोत नेतृत्व करीत असलेल्या आझाद मैदानातील आंदोलनालाही आमदार लांडगे यांनी पाठिंबा दिली होता.
गेल्या १५ ते २० दिवसांपासून एसटी कामगार आंदोलन करीत आहेत. परंतु, अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्याची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे एसटी कामगारांच्या मदतीसाठी आमदार लांडगे यांनी पुढाकार घेतला. सोमवारी वल्लभगर आगारातील सुमारे २०० आणि शिवाजीनगर आगारातील ३०० कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना किमान १५ दिवस पुरेल इतके अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.

राजकारण नव्हे, मानवता जपली पाहिजे…
राज्यात एसटी कामगारांच्या समस्या आणि मागण्यांवरुन राजकारण करण्यात महाविकास आघाडीचे नेते दंग आहेत. कामगारांना न्याय मिळवून द्यावा, यासाठी प्रत्येक स्तरातून मागणी होत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. राजकारण होईल, पण सर्वसामान्य कामगारांच्या कुटुंबाच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी कामगारांच्या मागण्या रास्त आहेत. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा असेल, तर आपण समाज म्हणून आता मानवता जपली पाहिजे. कामगार कुटुंबियांच्या पोटाचा प्रश्न सुटला, तर हा लढा आणखी तीव्र होईल. राज्य सरकारला कामगारांना न्याय द्यावा लागले, अशा भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या आहेत.