मातृशोकामुळे आमदार महेश लांडगे करणार नाहीत वाढदिवस
लोकवार्ता : भोसरीचे भाजप आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यासह संपूर्ण कुटुंब मातृशोकात बुडाले आहेत. लांडगे कुटुंबियांना आजही आईची आठवण आली की त्यांचे डोळे पाणावतात. आमदार महेश लांडगे, कार्तिक लांडगे, सचिन लांडगे त्यांच्या मातोश्री हिराबाई लांडगे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.

आजही लांडगे कुटुंब या दु:खातून बाहेर पडू शकलेले नाहीत. त्यामुळेच आमदार महेश लांडगे यांनी यंदा वाढदिवस साजरा करण्यास नकार दिला आहे. तसेच त्यांचे कार्यकर्ते, पक्षाचे लोक, माजी नगरसेवक, हितचिंतक यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतेही फ्लेक्स, होर्डिंग, जाहिरात, कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहन केले आहे.
आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस दरवर्षी २७ नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. एका महिन्यापासूनच कार्यक्रमांची स्पर्धा सुरु असते. प्रत्येक प्रभागात सामाजिक, धार्मिक, आरोग्य, पर्यावरण, लोककल्याण यासंबंधीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. भोसरी विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर पिंपरी चिंचवड शहरातील महेश लांडगे यांचे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहेत.
महेश लांडगे यांचे बंधू कामगार नेते सचिन लांडगे यांनी सर्व कार्यकर्ते, स्थानिक नेते, माजी नगरसेवक, हितचिंतक यांना विनम्र पत्र पाठवून दादांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याने जाहिराती, फ्लेक्स, कार्यक्रम आयोजित करू नये. कोणी आयोजन केले असेल तर लगेच रद्द करा. असे आवाहन सचिन किसनराव लांडगे यांनी केले आहे.