मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर
बायडेन, हॅरिस यांची भेट

लोकवार्ता । प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्यापासून अमेरिका दौरा सुरू होत आहे. या दौऱ्यात अफगाणिस्तानमधील चिंताजनक परिस्थिती, दहशतवाद, सामरिक सुरक्षा भागीदारी हे मुद्दे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या समवेत होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेच्या केंद्रस्थानी असतील. क्वाड राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत मोदी सहभागी होणार असून संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार आणि भारताचा स्थायी सदस्यत्व मिळण्याचा दावाही ते आमसभेत करणार आहेत.
परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याची रुपरेषा आज पत्रकार परिषदेत मांडली. उद्यापासून हा चार दिवसांचा दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी देखील यात सहभागी होणार आहेत.
मार्चमध्ये झालेल्या बांगलादेश दौऱ्यानंतरचा हा पंतप्रधानांचा पहिला मोठा परदेश दौरा असून अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतरची ज्यो बायडेन यांच्यासमवतेची त्यांची पहिली प्रत्यक्ष भेट या दौयात २४ सप्टेंबरला (शुक्रवारी) होईल. याआधी दूरध्नवीवरून आणि व्हर्च्यूअल बैठकांद्वारे दोन्ही नेत्यांचा संवाद झाला होता. तर उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनाही ते भेटतील. यासोबतच, अमेरिकेशी द्विपक्षीय वाटाघाटींसोबतच क्वाड या समूहातील ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिदा सुगा यांच्याशी पंतप्रधान मोदींची स्वतंत्र चर्चा होणार आहे.
सामरिक सुरक्षा, अफगाणचे मुद्दे चर्चेत
अमेरिकेसोबतच्या वाटाघाटींमध्ये द्विपक्षीय संबंधांसह व्यापार सामरिक सुरक्षा भागीदारी हे प्रमुख मुद्दे असतील. सोबत अफगाणिस्तान हा भारत आणि अमेरिकेसाठीही महत्त्वाचा मुद्दा असल्याने सर्व पैलूंवर चर्चा होईल अफगाणची भूमी दहशतवादासाठी वापर होऊ नये यासाठ सुरक्षा परिषदेने ठराव केला आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या देशांवर लक्ष् ठेवले जावे. तसेच अमेरिकेने सैन्य माघारी घेतले असले तरी या भागात लक्ष ठेवावे, असे भारतातर्फे सांगितले जाईल, असेही श्रृंगला म्हणाले.
उद्योगपतींशीही बोलणार
भारतातील गुंतवणूक वाढविण्यासाठी अमेरिकेतील उद्योगपतींशीह मोदी बोलणार असून शनिवारी होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्य आमसभेमध्ये मोदी प्रादेशिक सुरक्षा, कोविड स्थिती, दहशतवाद यावर बोलतील. तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेची ७५ वी वर्षपूर्ती आणि स्वातंत्र्यदिनाचे अमृतमहोत्सवी वर्ष हे औचित्य साधून सुरक्षा परिषदेच विस्तार, भारताला स्थायी सदस्यत्व यासारख्या भारताच्या हिताच्य मुद्द्यांवरही भाष्य करतील.