मोशीतील कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वनराई संस्थेची नियुक्ती ; प्रभागनिहाय ३२ युनिट सुरु
लोकवार्ता : शहरातील घराघरातून मोशी कचरा डेपो येथे जमा झालेला कचऱ्यातून कपडे, ई – वेस्ट व प्लास्टिक वेगळा करण्यासाठी प्रभागनिहाय ३२ युनिट सुरू करण्यात येणार आहेत. त्या कचऱ्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. त्या कामासाठी वनराई या संस्थेची थेट पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे.

घराघरांतून जमा केलेला ओला व सुका कचरा गोळा करून तो मोशी डेपोत टाकला जातो. तेथे कचऱ्यावर विविध प्रक्रिया केली जाते. टाकाऊ कपड्यांवर प्रक्रिया करण्यासाठी डेपोत स्वतंत्र यंत्रणा नाही. कपड्यांचे दिघटन होण्यास बराच कालावधी लागतो. अशा स्वरूपाचा कचरा संकलित करून त्यास पुनर्वापरायोग्य बनविण्याचे काम वनराई संस्थेमार्फत करण्यात येते.
हे काम शहरातील सर्व ३२ प्रभागनिहाय केले जाणार आहे. त्यासाठी सर्व प्रभागात एक युनिट सुरू केले जाणार आहे. प्रति युनिटचा खर्च ३२ हजार ५०० आहे. एकूण ३२ युनिटचा खर्च १० लाख ४० हजार इतका आहे. त्यात फॅब्रिकेशनचा समावेश आहे. इन्स्टॉलेशन, हॅण्डलिंग आणि ब्रँडींगचा समावेश आहे. हे काम प्रायोगिक तत्वावर ६ महिन्यांसाठी थेट वनराई संस्थेला देण्यात येणार आहे.
वनराईची या कामासाठी नियुक्ती करणे व युनिट उभारण्याच्या खर्चाच्या आरोग्य विभागाकडील प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना मंजुरी दिली आहे. सर्व आह क्षेत्रीय कार्यालयांतील आरोग्य विभागाकडून ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी टाटा एसीई हॉपर ही १० वाहने एका वर्षासाठी भाड्याने घेण्यात येणार आहेत. एका वाहनाचे एका दिवसाचे भाडे २ हजार ७२६ आहे. त्यानुसार वर्षाचे एकूण भाडे ९९ लाख ५० हजार इतके आहे. त्यास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.
दरम्यान, शहराचे दोन भाग करून घरोघरचा कचरा जमा करून तो मोशी कचरा डेपोत वाहन नेण्याचा ठेका बीव्हीजी व एजी इन्व्हायरो या दोन ठेकेदार कंपन्यांकडे आहे. कचरा संकलनासाठी सर्व वाहने त्या ठेकेदारांनी उपलब्ध करून देण्याची अट आहे, असे असताना पालिका कचरा संकलनासाठी स्वतः भाड्याने वाहने चेत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.