अखेर मोशी पोस्ट ऑफीस कार्यान्वीत ; २० वर्षांपासूनची मागणी प्रत्यक्षात !
– बो-हाडेवाडी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा
– माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे अन् कुटुंबियांचा पुढाकार
पिंपरी | लोकवार्ता-
मोशी, बो-हाडेवाडी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २० वर्षांपासून आळंदी पोस्ट ऑफिसची सुविधा वापरावी लागत होती. वारंवार मागणी करूनही मोशीला स्वतंत्ररित्या पिनकोड नसल्यामुळे आणि अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता या त्रासापासून नागरिकांची सुटका झाली आहे. मोशी पोस्ट ऑफिस सुरू झाल्यामुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे.
मोशी परिसरासाठी स्वतंत्र विद्या शहरी भागाशी जोडलेले पोस्ट कार्यालय आजपासून कार्यान्वित झाले आहे. त्याचे लोकार्पण पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका सारिका बो-हाडे, निर्देशक डाक सेवा सिमरन कौर, पुणे शहर पूर्व विभाग प्रवर अधीक्षक डाकघर गोपराजू सतीश, चिंचवड सुपर टाक निरीक्षक सी. एम. नदाफ, पोस्ट मास्तर जनरल पुणे रिजन मधुमिता दास, जनसंपर्क निरीक्षक के एस पारखी, यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

माजी नगरसेविका सारिका बो-हाडे म्हणाल्या की, आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोशी भागाचा खूप मोठा प्रश्न सुटला आहे. मोशी परिसर २० वर्षांपासून आळंदी पोस्ट ऑफीसला जोडले होते. याला ग्रामीण पिन कोड असल्यामुळे अडचणी येत होत्या. तसेच, पोस्टमनची कमतरता होती. आता पोस्ट ऑफीस शहरी भागात जोडल्यामुळे नवीन पिन कोड (411070) झाला असून, यामुळे अडचणी येणार नाही. पोष्टमन संख्या वाढवणार आहे. विशेष म्हणजे, नवीन आधार केंद्रसुद्धा पोस्ट ऑफीसमध्ये सुरू करण्यात येणार आहे.

प्रश्न मार्गी लागला याचे समाधान : सारिका बोऱ्हाडे
मोशी- बोऱ्हाडेवाडी परिसरातील नागरिकांच्या ‘टपाल येत नाही’ म्हणून माझ्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या. त्यासाठी मी पुणे व चिंचवड पोस्ट ऑफीसमधील अधिकाऱ्यांशी वारंवार पाठपुरावा केला. आता नागरिकांसाठी नवीन पोस्ट ऑफीस चालू झाले आहे. नागरिकांची अडचण यामुळे दूर होणार आहे. याचा फायदा मोशी, बो-हाडेवाडी सेक्टर ४, ६ व ९ या परीसरातील तसेच शिवरस्ता बो-हाडेवाडी येथील नागरिकांसाठी होणार आहे, अशी माहिती माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी दिली.
बोऱ्हाडे कुटुंबियांनी दिली स्वत:ची जागा…
मोशीतील पोस्ट ऑफीसचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी माजी नगरसेविका सारिका बो-हाडे यांनी यशस्वी पाठपुरावा केला. तसेच, वारंवार पुणे व चिंचवड पोस्ट कार्यालयाकडे मागणीपत्र सादर केले. यातून मोशी परिसराला स्वतंत्ररित्या पोस्ट कार्यालय उपलब्ध झाले आहे. शिवाय या कार्यालयासाठी बो-हाडे कुटुंबियांनी स्वतःच्या जागेमध्ये कार्यालय सुरू करण्यासाठी जागा दिली आहे. यामुळे येथील नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे, अशी भावना पोस्ट कार्यालय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.