“खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली युवराज संभाजीराजे छत्रपती यांची भेट”
-खासदार श्रीरंग बारणे आझाद मैदानावर दाखल.
मुंबई|लोकवार्ता –
मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी, विविध मागण्यांसाठी युवराज संभाजीराजे छत्रपती अनेक दिवसांपासून शासन दरबारी प्रयत्न करतात. त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल. राजे तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांची भेट घेऊन तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले. समाजाच्या चांगल्या मागण्यांसाठी ते लढत असून त्यांना माझे सहकार्य राहील अशी ग्वाही मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती हे 26 फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. अनेक नेत्यांनी संभाजीराजे यांच्या या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील आज युवराज संभाजीराजे यांची आझाद मैदानावर भेट घेतली.

खासदार बारणे म्हणाले, ”संभाजीराजे माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांची भेट घेतली. त्यांना तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले. राज्य सरकार, राजेंच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आजच बैठक झाली. त्यातून नक्कीच सकारात्मक तोडगा निघेल. समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी तीन दिवसांपासून ते उपोषणाला बसले आहेत. समाजासाठी ते लढा देत आहेत. त्यांच्या लढ्याला नक्कीच यश येईल. समाजासाठी या चांगल्या मागण्या आहेत. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी ते लढत असून या मागण्यांसाठी त्यांना माझे सहकार्य राहणार आहे”.