-नागरिकांना ‘रेशनकार्ड’साठी हेलपाटे मारायला लावू नका-श्रीरंग बारणे.
-खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतला अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या कामाचा आढावा
पिंपरी | लोकवार्ता-
रेशनकार्डसाठी (शिधापत्रिका) अर्ज केल्यानंतर रेशनकार्ड लवकर मिळत नाही अशा नागरिकांच्या तक्रारी येतात. अर्ज केल्यानंतर कमीत कमी कालावधीत रेशनकार्ड देणे आवश्यक आहे. शहरातील एकही गोरगरीब नागरिक रेशनिंग पासून वंचित राहता कामा नये याची खबरदारी घ्यावी. नागरिकांना रेशनकार्डसाठी हेलपाटे मारायला लावू नयेत, अशा सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना दिल्या.

पिंपरी-चिंचवड शहरासाठीच्या निगडी येथील अन्नधान्य वितरण(परिमंडल) कार्यालयास खासदार बारणे यांनी शुक्रवारी (दि.11) भेट दिली. नायब तहसीलदार दिनेश तावरे यांनी खासदार बारणे यांचे स्वागत केले. कार्यालयातील कामाची माहिती दिली. खासदार बारणे यांच्या हस्ते दिव्यांग नागरिकांना रेशनिंगकार्डचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, प्रहार संघटनेचे दत्तात्रय भोसले, राजेंद्र वाकचौरे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आनंद बनसोडे, ज्ञानेश्वर शिंदे, विजय गुप्ता, सुरेश वाडकर, वैभवी घोडके, संजय धुतडमल, धर्मपाल तंतरपाळे, संदिपान झोंबाडे, चिंतामणी सोंडकर उपस्थित होते.

सर्व्हर डाऊन असतो. त्यामुळे रेशन कार्ड देण्यास विलंब होतो असे नायब तहसीलदार दिनेश तावरे यांनी सांगितले. त्यावर मार्ग काढावा. नागरिकांना तत्काळ सेवा सुविधा पुरवाव्यात असे सांगत खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, रेशनिंग दुकानदारांच्याही अनेक तक्रारी आहेत. त्यात प्रामुख्याने रेशन वेळेवर मिळत नसल्याची त्यांची वारंवार तक्रार असते. त्यांना वेळेवर रेशन द्यावे. जेणेकरून नागरिकांनाही वेळेवर रेशन मिळेल. एखाद्या रेशनकार्ड धारकाने सलग तीन महिने धान्य घेतले नाही. तर, तीन महिन्यांनी त्याचे रेशनिंग बंद होते. त्याला रेशन दिले जात नाही. हे अनेक रेशनकार्ड धारकांना माहिती नाही. याबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी. त्याबाबत नागरिकाला एसएमएस पाठवा.
एक खिडकी योजनेअंतर्गत लोकांकडून अर्ज घेतले जातात. त्यांना टोकन देऊन पुढील कार्यवाही केली जाते. रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले आहे. पण, कामकाजात आणखी सुसूत्रता आणावी. नागरिकांची कामे जलदगतीने करावीत. कार्यालयात साफसफाई व्यवस्थित आहे. भिंतीची रंगरंगोटी केली आहे. नागरिकांना बसण्याची व्यवस्था केली असल्याने खासदार बारणे यांनी अधिकाऱ्यांचे कौतुकही केले आहे.