“महावितरणचे अधिकारी आले ताळ्यावर, भोसरीतला अंधार होणार दूर”
नगरसेवक रवि लांडगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सोनाली उदावंत यांनी केलेल्या आंदोलनाला भोसरीकरांचा उत्तम प्रतिसाद
पिंपरी |लोकवार्ता-
भोसरी परिसरात वारंवार होत असलेला वीज कपात थांबवून नागरिकांना २४ तास सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सोनाली संजय उदावंत यांनी महाजनआंदोलनाच्या माध्यमातून हजारो नागरिकांच्या विशाल मोर्चाचे आयोजन केल्यानंतर महावितरणचे अधिकारी अखेर ताळ्यावर आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भोसरीच्या सर्वच भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. तासन्तास वीज गायब होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. याप्रकरणी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही दिवसांतून किमान ७-८ तास नागरिकांना अंधारातच राहावे लागत आहे. त्यामुळे महावितरणबाबत भोसरीतील नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. या संतापाचा उद्रेक होऊ नये म्हणून नागरिकांच्या या गंभीर प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवि लांडगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सोनाली उदावंत यांनी भोसरी, बालाजीनगर, गवळीमाथा येथील महावितरणच्या कार्यालयावर गुरूवारी (दि. १८) महाजनआंदोलन करण्याची हाक दिली होती.

रवि लांडगे आणि सोनाली उदावंत या दोघांच्या हाकेला साथ देत भोसरीतील हजारो नागरिक गुरूवारी सकाळी अकरा वाजता कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील मोकळ्या मैदानावर जमा झाले होते. तेथून हे नागरिक बालाजीनगर, गवळीमाथा येथील महावितरणच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याच्या तयारीत होते. नागरिकांचा एवढा मोठा जमाव पाहून पोलिस आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या ऊरात धडकी भरली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश असल्याने मोर्चा काढता येणार नसल्याचे सांगितले. नागरिकांनीही सामंजस्याची भूमिका घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विजेचा लपंडाव थांबवावा, अशी मागणी केली.

नागरिकांच्या वतीने नगरसेवक रवि लांडगे, सामाजिक कार्यकर्ते संजय उदावंत, प्रवीण लांडगे, मंगेश आंबेकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी भोसरीतील विजेचा लपंडाव थांबवण्यासाठी ट्रान्सफार्मरची क्षमता वाढवण्याचे तसेच नादुरूस्त मिनी बॉक्स तातडीने बदलण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे रवि लांडगे आणि सोनाली उदावंत यांनी भोसरीत सुरळित वीजपुरवठा व्हावा आणि नागरिकांना अंधारात राहावे लागू नये यासाठी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले आहे. आता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची लवकरात लवकर पुर्तता न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रवि लांडगे आणि सोनाली उदावंत यांनी दिला आहे.