महापालिकेतर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका (एएनएम) पदांची भरती रद्द
-प्रशासकीय कारणास्तव ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.
पिंपरी | लोकवार्ता-
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चुकीच्या कारभाराचा फटका आरोग्यसेविका परीक्षार्थीना बसला आहे. महापालिकेतर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका पदांची मुलाखतीद्वारे आज (दि. 16 आणि उद्या 17 मार्च) रोजी होणारी भरती प्रक्रिया होणार होती. मात्र ही भरती प्रक्रिया अचानक रद्द केल्याने परीक्षार्थींना मोठा मनस्ताप करावा लागला आहे. महापालिकेनं प्रशासकीय कारण देत ही परीक्षा रद्द केली आहे. मात्र या भरती परीक्षेसाठी महाराष्ट्राच्या गडचिरोली, नाशिक, नागपूर मालेगावसह विविध भागातून आलेल्या परीक्षार्थींना त्रास सहन करावा लागला आहे. आज सकाळी महापालिका भवन परिसरात जमल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याची माहिती परीक्षार्थींना मिळाली. वेळेत परीक्षा रद्द झाल्याची माहिती न मिळाल्याने नाहक त्रासास सामोरे जावे लागले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका या रिक्त पदासांठी 7 मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार 16 व 17 मार्च रोजी आरोग्य सेविका या पदाकरिता थेट मुलाखती चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासकीय कारणास्तव ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मंगळवारी संध्याकाळी अचानक जाहीर केले. संबंधित परीक्षा रद्द करणेबाबत मान्यता काल सायंकाळपर्यंत मिळाली. त्यानंतर महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.