विरोध झाला तर… कारवाई अजून तीव्र करण्याचा महापालिकेचा इशारा !
-व्यापाऱ्यांचा विरोध ; कारवाई थांबवण्याची मागणी.
पिंपरी । लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड महापालिकेने शासकीय राजवट लागू झाल्यानंतर अनधिकृत बांधकाम व पत्राशेड वर कारवाईत सुरु करण्यात आली आहे. रस्त्यालगतच्या अनधिकृत बांधकामांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेकडून रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या, बांधकामांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. पिंपळे गुरव परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. नाशिक फाटा ते पांजररपोळ, रावेत यादरम्यान ही रस्त्यावरच्या अनधिकृत शेड, टपऱ्या आणि बांधकामांच्या उभारणीवर कारवाई करण्यात आली आहे. “ड” क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील पिंपळे गुरव प्रभाग क्र. 29 येथे काल महानगरपालिकेची बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 42 पत्राशेड तसेच बांधकामे अंदाजे क्षेत्रफळ 67 हजार चौ. फूट अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पालिका अतिरिक्त आयुक्त (2) यांच्या मार्गदर्शनाखाली सहशहर अभियंता (बांधकाम परवानगी) क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता (बांधकाम परवानगी) यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. तर यानुसार ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पनवी नदीपात्रातील जाधवघाट रावेत येथील जवळपास 4119 चौरस मीटर अनधिकृत पत्राशेड पाडण्यात आले. अशी 19 पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. तर क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी ते पांजरपोळपर्यंत 61 मीटर रस्ता रुंदीतील दुतर्फा अतिक्रमणे काढली. कारवाईदरम्यान अनुचित प्रकार घडू नये, म्हणून राज्य सुरक्षा महामंडळाचे 48 सुरक्षारक्षक, पोलीस कर्मचारी, अग्निशामक दल कर्मचारी, रुग्णवाहिका तसेच विद्युत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.