महापालिका घनकचरा व्यवस्थापनासाठी 4 ट्रान्सफर स्टेशन उभारणार
पिंपरी ।लोकवार्ता-
पिंपरी-चिंचवड शहरात घनकच-याचे योग्य रितीने व्यवस्थापन करण्यासाठी शहरात चार ठिकाणी कचरा हस्तांतरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे ओला व सुका कचरा कॉम्पॅक्ट करून हूक लोडर वाहनाद्वारे मोशी कचरा डेपो येथे नेणे शक्य होणार आहे. या कामासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून 22 कोटी 20 लाख रूपये इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यासाठी 15 व्या वित्त आयोगाकडून अनुदान मिळविण्यासाठी प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे.
शहरात दररोज निर्माण होणा-या घनकचऱ्याच्या व्यव्सथापनेसाठी मोशी कचरा डेपो येथे सुमारे 81 एकर इतकी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. महापालिका हद्दीत प्रतिदिन एक हजार मेट्रीक टन कच-याची निर्मिती होते. हा घनकचरा मोशी कचरा डेपो परिसरात आणला जातो. शहरात सुमारे 25 ते 30 ठिकाणी रस्त्याकडेला किंवा मोकळ्या जागेवर संकलन केंद्र कार्यान्वित आहेत.

हा कचरा कॉम्पॅक्टरद्वारे शहरातील ब-याच भागातून गोळा करत असताना इंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. हवेचे प्रदुषणही होते. लिचेटची गळती त्यासोबतच दुर्गंधीचा त्रासही होतो. त्यामुळे परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत तक्रार दाखल करत आहे . हे टाळ्ण्यासाठी महापालिका उपायुक्तांनी इंदोर शहराच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात महापालिका हद्दीत किमान चार ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्याबाबत सुचना दिल्या आहेत.
महापालिका आयुक्तांच्या 17 सप्टेंबर 2021 रोजीच्या मान्य प्रस्तावानुसार कासारवाडी मैलाशुद्धीकरण प्रकल्प, काळेवाडीतील एस. एम. कॉलेजसमोरील स्मशानभुमीजवळील जागा, जुनी सांगवी येथील नदीच्या बाजूची पाटबंधारे विभागाची जागा, सेक्टर 23 – निगडीतील गायरान जागा, भोसरी-गवळीमाथा येथील कचरा स्थानांतर केंद्र या जागांपैकी चार ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे. हे ट्रान्सफर स्टेशन उभारल्यामुळे त्या-त्या भागातील ओला व सुका कचरा छोट्या गाडीतून एकाच ठिकाणी गोळा होईल.