कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका ‘चाईल्ड हेल्पलाईन’ सुरु करणार
विद्यार्थ्यांनी कोरोना विषयक प्रश्न असल्यास महानगरपलिकेच्या ई-मेल आयडी वर पाठवावे

लोकवार्ता।प्रतिनिधी
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरातील लहान मुलांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. या हेल्पलाईनचे वैशिष्ट म्हणजे सदर हेल्पलाईन शालेय विद्यार्थ्यांकडून चालविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु असून महापालिका हद्दीतील आठ शाळांमधील इयता ७ वी ते १० वी चे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक यांची एकत्र बैठक महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कै.मधुकरराव पवळे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुक्त पाटील यांनी माहिती दिली.
शहरातील विद्यार्थ्यांनी कोरोना विषयक प्रश्न असल्यास महानगरपलिकेच्या cto@pcmcindia.gov.in या ई-मेल आयडी वर पाठवावे किंवा आपल्या आपल्या वर्गशिक्षकांकडे प्रश्नांची यादी द्यावी. मनपामार्फत प्रश्नावली तयार करण्यात येणार असून हेल्पलाईन चालविणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना कोरोना आजार व उपचार याबाबत सविस्तर प्रशिक्षण व माहिती देण्यात येणार आहे.
या हेल्पलाईनमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहाय्य देखील राहणार आहे. तसेच शिक्षक आणि पालकांचा समावेश असणार असल्याची माहितीही आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. चाईल्ड हेल्पलाईनचा मुख्य हेतू लहान मुलांमधील कोरोनाबाबतची भीती दूर करणे हा आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, उपअभियंता विजय भोजने, वैशाली ननावरे, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी पराग मुंढे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल पुराणिक तसेच ज्ञानप्रबोधिनी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद सादूल, महानगरपालिकेच्या पिंपळेगुरुव येथील शाळेचे अनिल गायकवाड, श्रमिकनगर शाळेचे जबीन सय्यद, सिटी प्राईड शाळेच्या अदिती पुराणिक, गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलचे संजीव वाखारे, अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयाचे सागर बंडलकर, वर्षा हडपसरकर आणि विविध शाळांचे १६ विद्यार्थी उपस्थित होते.