जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी महापालिका कर्मचारी पिंपरी ते विधानसभा पायी वारी करून आंदोलन..
महापालिका कर्मचारी योगेश रसाळ व प्रशांत भिसे पायी मुंबईकडे रवाना

संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर सद्यस्थितीत गाजत असलेला शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीतील सर्वात ऐरणीवरचा प्रश्न म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करणे. याच मुद्द्याला अनुसरून येत्या 14 मार्चला राज्यभरातील विविध स्तरातील सर्वच शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याबाबतचा इशारा राज्य सरकारला दिलेला आहे त्याच धर्तीवर त्यांना पाठिंबा दर्शविण्याकरिता महानगरपालिका नगरपालिका व इतर निमशासकीय संस्था देखील सदर संपत सहभागी होऊन संप 100%टक्के यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नोव्हेंबर 2005 नंतर स्थायीसेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील सद्यस्थितीत नवीन म्हणजेच परिभाषित अंशदान पेन्शन योजना लागू आहे सदर कर्मचाऱ्यांना 2005 पूर्वी रुजू झालेल्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कामगार प्रतिनिधी श्री योगेश पांडुरंग रसाळ व श्री प्रशांत वामन भिसे हे दोघे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आज दिनांक 10 मार्च 2023 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते विधान भवन मुंबई अशी पायी प्रवास करून जाणार आहेत जेणेकरून 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवरील लाभलेल्या अंशदान पेन्शनचा अन्याय दूर होईल व त्यांना देखील इतर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले जाईल.
सदर संकल्प यात्रेत महानगरपालिकेतील इतरही कर्मचारी वेगवेगळ्या टप्प्यांवर सामील होत असून मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यासाठी ते दिनांक 14 मार्च 2023 रोजी विधान भवनाच्या दालनात पोहोचतील. या दोन्ही कर्मचाऱ्यांनी उचललेल्या पावलांचे संपूर्ण महापालिकेच्या स्तरावरून सर्वच कर्मचाऱ्यांच्या तोंडून कौतुक होत आहे.