मोशीतील अरुंद रस्त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष
आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे

लोकवार्ता । प्रतिनिधी
मोशी, बोन्हऱ्हाडेवाडी भागातील मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या गंधर्व एक्सलन्सी सोसायटी भागातील रस्ता रुंदीकरणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीसमवेत अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात शिवसेना महिला संघटिका रुपाली आल्हाट यांनी सांगितले, की अवघ्या पंधरा फूट रस्त्यावरून येथील नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. रस्ता ओलांढताना वाहने थांबवून ठेवावी लागतात. यामुळे नागरिकांच्या कामकाजाचा खोळंबा होतो. याबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र, पालिकेकडून याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे येत्या आठवड्याभरात येथील बारा मीटर रस्त्याचे काम मार्गी न लागल्यास आंदोलन करण्याचा इशारा आल्हाट यांनी दिला आहे.
मोशी वोन्हऱ्हाडेवाडी हद्दीत गंधर्व एक्सलन्सी फेज एक व दोन, ग्रीन स्क्वेअर सोसायटी भागात जवळपास अकराशे सदनिकाधारक राहतात. त्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी सध्या केवळ पंधरा फुटांचा रस्ता आहे. यामुळे वाहनांना प्रवास करताना अडचणी येत आहे. या ठिकाणी बारा मीटर रस्ता प्रास्तवित आहे तो मार्गी लागल्यास सोसायट्यांची गैरसोय दर होणार आहे. मुळात रस्ताच मार्गी लागला नसताना गृहप्रकल्पांना पालिकेने परवानगी दिली कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नागरिकांनीदेखील याबाबत तक्रारी केल्या असून रस्त्याचा प्रश्न रस्त्यावर दोन गाड्या पास होताना अपघाताच्या घटनादेखील घडल्या आहेत. या रस्त्यावर खड्डे पडले असून पावसाळ्यात पाणी जमा होत असल्यामुळे वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे.
- पंधरा फुटांच्या रस्त्यावरून करावा लागतो प्रवास
- बारा मीटर रस्त्याचे काम मार्गी लावा