राज्यातील कारागृहांत सर्वाधिक कैदी ‘मर्डर’चे
क्षुल्लक कारणावरून जीव घेण्याचे प्रमाण वाढले

लोकवार्ता । प्रतिनिधी
पुणे : राज्यातील दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या खुनांच्या घटना चिंतेत पाडणाऱ्या आहेत. गेल्यावर्षी ‘मर्डर’ चे प्रमाण २.८६ टक्क्याने वाढले असून, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १०२ खुनाच्या घटना घडल्या आहेत. दुसरीकडे, कारागृहातही याच गुन्ह्याचे सर्वाधि कैदी शिक्षा भोगत आहेत. शिक्षा भोगत असलेल्या एकूण ८२७४ पैकी तब्बल ४८२५ म्हणजेच ५८ टक्के कैदी हे मर्डर’ चे आहेत.
खुनाच्या घटनांचे प्रमाण पुणे, मुंबईसारख्या महानगरांतच नव्हे, तर चंद्रपूरपर्यंत छोट्या शहरातही वाढल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये राज्यात १,५४५ खुनाच्या घटना घडल्या. दिलासा देणारी बाब म्हणजे मागीलवर्षीच्या खुनाच्या घटनांपैकी तब्बल १५.८ टक्के प्रकरणात आरोपींचा शोध घेण्यात आला. याबरोबरच या गुन्ह्यातील दोषसिद्धीचे राज्यातील कारागृह प्रशासनाच्या अहवालावरून स्पष्ट होते. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये कैद्यांची संख्या १.७० टक्क्यांनी घटली आहे. मात्र, त्याचवेळी सिद्धदोष बंदींच्या संख्येत मात्र १.११ टक्क्याने वाढ झाली आहे.
- ग्रामीण भागात खुनाचे सर्वाधिक गुन्हे पुणे ग्रामीणमध्ये नोंद आहेत. महानगरातही या गुन्ह्यांचे प्रमाण प्रशासनाची झोप उडविणारे आहे.
- मुंबई, नागपूर, ठाणे, पुणे आणि पिंपरी चिंचवड या पाच महानगरांत सर्वाधिक खून पडले.
- विशेष म्हणजे, सध्या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सर्वप्रकारच्या गुन्ह्यातील कैद्यांमध्ये तरुणाईचे प्रमाण मोठे आहे.