आजपासून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे मंदिर दर्शनासाठी बंद; पंतप्रधान येणार देहू भेटीला
लोकवार्ता : आजपासून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहू भेटीला येणार असल्याने त्यांचा सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या १४ जूनला पंतप्रधान पुण्यातील देहू गावात येतील. त्यांच्या शुभहस्ते संत तुकाराम महाराजांची मूर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर देहूमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने वाढ करण्यात आली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने आज सकाळी ८ वाजल्यापासून ते १४ जून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. दरम्यान, डीजी रजनीश सेंठ यांनी पोलिस पथकासह तीन दिवसांपूर्वीच देहूतील शिळामंदिर, मुख्य मंदीर परिसराला भेट देऊन सुरक्षिततेची पाहणी केली होती. 14 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूतील शिळा मंदिर आणि तुकोबांच्या मुर्तीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर देहूपासून काही अंतरावरच असणाऱ्या एका ठिकाणी पंतप्रधान मोदी वारकऱ्यांना संबोधन करणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडी, वारकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
