“शहराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे लॉबिंग”
– पवारांकडूनही होतेय चाचपणी
-उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे फेऱ्या वाढल्या
पिंपरी। लोकवार्ता –
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी ‘लॉबिंग’ सुरू केले आहे. आपल्या समर्थकांमार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न हे इच्छुक करताना दिसत आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शहरातील पदाधिकाऱ्यांशी स्वतः संपर्क ठेऊन चाचपणी सुरू केली जात आहे. संजोग वाघेरे, मयुर कलाटे, अजित गव्हाणे यांचे समर्थक शहराध्यक्ष पद मिळावे म्हणून सोशल मीडियासह पक्षांतर्गत ऍक्टिव झाले आहेत. त्यामुळे शहराध्यक्ष पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार हा उत्सुकतेचा विषय बनला आहे. तर नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातूर दौऱ्यात जाताना भोसरीच्या राजकारणातील मुरब्बी माजी आमदार विलास लांडे यांना बोलावून घेतले. त्यामुळे शहरातील राजकारणात ट्विस्ट निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीतील शहर पदाधिकाऱ्यांचे येन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने राजीनामे घेऊन त्यांच्या सुमार कामगिरीवर नाराजीचं व्यक्त केली आहे. शहरात देखील तशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांचा शोध पक्ष नेतृत्व घेत आहे. 24 नोव्हेंबर रोजी राजीनामे घेतल्यानंतर 26 नोव्हेंबरला नव्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर होतील अशी शक्यता होती. त्यासाठी शहराध्यक्ष पदासाठी नगरसेवक अजित गव्हाणे, मयुर कलाटे यांची नावे समोर आली. मात्र या नावावर पक्षांतर्गत जेष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त करत हस्तक्षेप केल्यायामुळे नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा विषय रेंगाळला. नवीन घोषणा होईपर्यंत इच्छुकांनी मात्र आपल्या समर्थकांमार्फत ‘लॉबिंग’ सुरू केले आहे.