राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नवस बोलायला आले, पण मंदिरातून देवच गायब
भाजपचा BJP देव काही केल्या आम्हाला दिसत नाहीए

लोकवार्ता । प्रतिनिधी
पुणे : भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी पुण्यातील औंध भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक छोटं मंदिर उभारण्यात आले आहे. मोदींची ही मूर्ती खास जयपूर येथून तयार करून आणली आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागला होता. मात्र आता हा पुतळा हटवण्यात आला आहे. मोदींचा पुतळा रातोरात हटवण्यात आल्याची माहिती सकाळी समोर आली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नवस बोलायला मंदिराजवळ पोहोचले. पण मोदींचा पुतळा हलवण्यात आल्याचं समजल.
औंध गावातील ॲड. मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून मयूर मुंडे व आणि कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून मोदी मंदिर उभारलं. परिसरातील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते १५ ऑगस्टला मंदिराचे उद्घाटन करण्यात आलं. या मंदिर उभारणीचं वृत्त देशात चर्चिलं गेलं. यावर बरीच टीकादेखील झाली. त्यानंतर भाजप नेतृत्त्वानं याची दखल घेतली. आज सकाळी औंधमधील मंदिर झाकण्यात आलं. त्यातील मोदींचा पुतळादेखील मुसळे यांच्या कार्यालयात नेण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींचा पुतळा हटवण्यात आल्याची माहिती समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंदिराजवळ धाव घेतली. त्यांनी या भागात उपरोधिक आंदोलन केलं. ‘देशापुढे असलेले प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही साकडं घालायला मंदिरात आलो होतो. मात्र भाजपचा BJP देव काही केल्या आम्हाला दिसत नाहीए. पेट्रोल, डिझेल, सिलिंडरचे दर कमी होऊ दे, यासाठी नवस बोलायला आम्ही इथे आलो. पण देवच दिसत नसल्यानं आम्हाला अगदी भरून आलं,’ अशी टोलेबाजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. देव चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.