मोशी येथील आरटीओ परिसरात वाहतूक प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिक त्रस्त!
-नागरिकांना वाहतूक कोंडीतून करावा लागतोय सामना.
मोशी । लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूच्या परिसरासाठी मोशी प्राधिकरण भागात आरटीओ सुरू केले आहे. परंतु आरटीओ संबंधी काम घेऊन येणाऱ्या नागरिकांना गाडी पार्क करण्यासाठी जागा नाही. त्यामुळे आरटीओ परिसरातील सर्व रस्त्यांवर अनधिकृतपणे पार्किंग केले जाते. त्यामुळे आरटीओ कार्यालया शेजारील रस्त्याला व परिसराला बेकायदा वाहनतळाचे ग्रहण लागले आहे. येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आरटीओमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अंतर्गत भागात प्रवेश करण्यासाठी असलेल्या रस्त्याच्या बाजूला वाहने बेशिस्तपणे उभी केली जात आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, वाहनतळाचे धोरण ठरविण्यास दिरंगाई होत आहे. मोशी प्राधिकरणामध्ये दळणवळणासाठी स्पाइन रस्ता आहे.
शहरातील सर्वात प्रशस्त आणि चकाचक रस्ता म्हणून स्पाइन रस्त्याकडे पाहिले जाते. या रस्त्याने दररोजच मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. मॉलमध्ये येणारी वाहने सेवा रस्त्यावर उभी असतात. स्पाइन रस्ता विकसित करताना वाहनतळाबाबतचा विचार झालेला नाही. तर काही खासगी व्यापारी संकुलांनी विकसित केलेल्या वाहनतळांचा वापर होत नसल्याने ही वाहनतळे ओस पडली आहेत.
| त्यामुळे स्पाइन सेवा रस्ते वाहनचालकांनी गिळंकृत केल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. स्थानिक नागरिकांना या वाहतुकीचा त्रास होऊ नये म्हणून या रस्त्यालगत सेवा रस्ताही तयार करण्यात आला आहे. मात्र, या सेवा रस्त्यांवर बेकायदापणे वाहने उभी केली जात आहेत. भोसरी औद्योगिक परिसरात जाणारी मलिवाहतूक वाहने गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर उभी केली जात आहेत. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने येथील वाहतूक कोंडी व अतिक्रमणावर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.