निर्भिड, निष्पक्ष पत्रकारांना शांततेचे नोबेल
एकाधिकारशाहीला आव्हान

लोकवार्ता । प्रतिनिधी
फिलिपाईन्समधील पत्रकार मारिया रेसा आणि रशियातील पत्रकार दिमित्री मुरातोव यांना २०२१चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्यासाठी त्यांना गौरवण्यात आले आहे.
नॉर्वेच्या नोबेल समितीचे बेरिट रेस अँडरसन यांनी शुक्रवारी या मानकऱ्यांची घोषणा केली. त्यांनी म्हटले आहे, ‘‘की मुक्त, स्वतंत्र, तथ्याधिष्ठित पत्रकारितेच्या रक्षणासाठी या दोघांनी सत्तेचा गैरवापर, खोटारडेपणा, युद्धखोरीजन्य प्रचार याविरोधात लढा दिला. अभिव्यक्ती आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य, देशांमधील बंधुभाव, नि:शस्त्रीकरण याशिवाय चांगल्या जगाची निर्मिती होऊ शकत नाही.’’
रेसा यांनी २०१२ मध्ये रॅपलर हे वृत्तसंकेतस्थळ स्थापन केले असून अध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांच्या वादग्रस्त राजवटीविरोधात, अमली पदार्थांच्या घातक वापराविरोधात मोठा लढा दिला आहे. समाजमाध्यमे कशा खोट्या बातम्या पसरवतात, विरोधकांचा छळ कसा होतो, सार्वजनिक पातळीवरील चर्चेला भलतीच दिशा दिली जाते यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.
मुरातोव हे रशियातील नोव्हाया गॅझेटा या वृत्तपत्राचे संस्थापक असून १९९३ मध्ये त्यांनी ते स्थापन केले. नोव्हाया गॅझेटा हे निष्पक्ष वृत्तपत्र असून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर नेहमीच टीका केली आहे. वृत्तपत्राच्या तथ्याधिष्ठित व व्यावसायिक पत्रकारितेमुळे रशियन समाजाच्या उजेडात न आलेल्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला गेला आहे.
पुरस्कार जाहीर करताना पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे, की दिमित्री मुराटोव यांनी त्यांच्या आदर्शानुसार काम केले. ते अतिशय बुद्धिमान व धाडसी आहेत यात शंका नाही. त्यांच्याविषयी एवढे सांगणे पुरेसे आहे. त्यांचे या पुरस्कारासाठी आम्ही अभिनंदन करीत आहोत.
शांततेचा नोबेल पुरस्कार १.१४ दशलक्ष डॉलर्सचा असून स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेल यांनी त्यांच्या इच्छेनुसार काही रक्कम या पुरस्कारासाठी ठेवली होती, त्यातून हे पुरस्कार देण्यात येतात.
एकाधिकारशाहीला आव्हान
रेसा यांनी फिलिपाइन्समधील एकाधिकारशाही विरोधात रॅपलर या डिजिटल माध्यम कंपनीच्या मार्फत लढा दिला. ड्युटेर्ट यांच्या वादग्रस्त राजवटीविरोधात त्यांनी आवाज उठवला. अमली पदार्थांविरोधात मते मांडली. त्या देशात अमली पदार्थाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्याविरोधात त्यांनी लढा दिला.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा
दिमित्री मुराटोव यांनी रशियात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. १९९३ मध्ये त्यांनी नोव्हाजा गॅझेटा हे वृत्तपत्र स्थापन केले. २४ वर्षे ते त्याचे संपादक होते. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करून तथ्याधारित पत्रकारिता केली. भ्रष्टाचार, राजकीय हिंसाचार, बेकायदेशीर अटका, निवडणूक गैरप्र्रकार, रशियन लष्कराने वापरलेले जल्पकांचे काफिले यांच्यावर त्यांनी टीका केली. त्यांच्या वृत्तपत्रातील सहा जण चेचेन्यातील युद्धावर प्रकाश टाकल्याने मारले गेले होते, त्यात अॅना पोलिटस्काया यांचा समावेश होता. धमक्या येऊनही त्यांनी स्वतंत्र धोरण चालूच ठेवले.