‘स्थायी’ सदस्यांना ‘लाच लुचपत’ ची नोटीस
तपासामध्ये १६ पाकिटांची बाब समोर आली आहे
लोकवार्ता । प्रतिनिधी
पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी नोटीस बजावली आहे. ठेकेदारांकडून लाच घेतल्याप्रकरणी भाजपचे समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांना १८ ऑगस्टला अटक झाली होती. त्या प्रकरणी तपास करण्यासाठी समितीच्या सदस्यांना जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
समितीची ऑनलाइन सभा बुधवारी झाली. सभा झाल्यानंतर उपस्थित सर्व सदस्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोटीसीचे पत्र दिले.
जाहिरात होर्डिग्ज लावण्याचा मंजूर ठेक्याची वर्कऑर्डर देण्यासाठी लाच मागितली जात असल्याची तक्रार फुगेवाडीतील एका ठेकेदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार विभागाने सापळा रचून समितीच्या स्वीय सहायकांसह कर्मचारी व अध्यक्षांना १८ ऑगस्टला अटक केली होती.
तपासामध्ये १६ पाकिटांची बाब समोर आली आहे. त्या दृष्टीने माहिती घेण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने समितीतील सर्व सदस्यांना नोटीस दिली आहे. येत्या २ दिवसांत विभागाच्या पुणे कार्यालयात उपस्थित राहून जबाब देण्याबाबत त्या पत्रात सांगण्यात आले आहे.