फक्त पुरुषांचं मंत्रीमंडळ; महिलांना स्थान नाहीच !
लोकवार्ता : काही वेळापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडला. मात्र या सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे अनेक महिला उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे.

स्त्री पुरुष समानता हा विषय फक्त भाषणांपुरताच बोलण्याचा मर्यादित आहे का? असा प्रश्न पडावा असं मंत्रिमंडळ आज महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलं आहे. शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला आणि पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये एकाही महिलेला मंत्री पदाची संधी देण्यात आली नाही.
त्यानंतर या मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या नेत्यांवर विरोधकांसह भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही टीका केली. या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत.
राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही टीका करत थेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे. “स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे”, असं सुप्रिया सुळेंनी ट्विट केलं आहे.