पीएमआरडीए गृहप्रकल्पामध्ये अनुपस्थितीत राहिलेल्या लाभार्थ्यांऐवजी प्रतीक्षा यादीतील ४५० जणांना संधी
-पीएमआरडीए पेठ क्रमांकमधील गृहप्रकल्पासाठी ३४०० जणांना अंतिम वाटपपत्र दिले.
पुणे । लोकवार्ता-
पुणे । लोकवार्ता-
पीएमआरडीए पेठ क्रमांकमधील गृहप्रकल्पासाठी ३४०० जणांना आत्तापर्यंत अंतिम वाटपपत्र दिले आहे. निवड यादीतील मात्र अपात्र ठरलेल्या आणि कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित न राहिलेल्या लाभार्थ्यांऐवजी आता प्रतीक्षा यादीतील सुमारे ४५० जणांना संधी दिली जाणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे सह – आयुक्त बन्सी गवळी दिली.

पेठ क्रमांक १२ येथील गृहप्रकल्पात एकूण ४ हजार ८८३ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. त्यासाठी निवडआणि प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली. प्रतीक्षा यादीतील १५० जणांच्या कागदपत्रांची तपासणी झाली आहे. तर, ३०० जणांच्या कागदपत्रांची तपासणी बाकी आहे. निवड यादीतील लाभार्थ्यांनी पहिल्याटप्प्यात घरांसाठी १० टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे. मात्र, १५० लाभार्थ्यांनी ही रक्कम अद्याप भरलेली नाही. त्यामुळे त्यांना ही रक्कम भरण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या आहे. ही रक्कम न भरल्यास प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.
पेठ क्रमांक १२ मधील गृहप्रकल्पाचे सध्या ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. गृहप्रकल्पातील सर्व ४८८३ सदनिकांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. रस्ते, विद्युत वाहिन्या, मैलाशुद्धीकरण केंद्र, विद्युतविषयक कामे सध्या सुरू आहेत. ऑक्टोबर अखेर ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर प्रत्यक्ष लाभार्थ्यांना घरांचा ताबा देण्यात येणार आहे.