ग्रुहप्रकल्पांमध्ये ओला कचरा व्यवस्थापन उपाययोजनांचे आदेश बांधकाम व्यवसायिकांना द्या हौसिंग फेडरेशनची मागणी
-चिखली मोशी पिंपरी-चिंचवड हौसिंग फेडरेशनची मागणी.
मोशी । लोकवार्ता-
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये असणाऱ्या विविध मोठ्या गृह प्रकल्पांमध्ये अद्यापही कचरा व्यवस्थापन विघटन प्रकल्प उभारण्यात आलेले नाहीत. यामध्ये नागरिकांचा कोणताही दोष नसताना नाहक सोसायट्यांना आता दंडाची आकारणी होत आहे. त्यामुळे ज्या सोसायट्यांमध्ये असे विघटन प्रकल्प नसतील असे गृहप्रकल्प उभारणाऱ्या संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी चिखली मोशी पिंपरी-चिंचवड हौसिंग फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना चिखली मोशी पिंपरी-चिंचवड हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी याबाबत निवेदन दिले आहे. सांगळे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, प्रधानमंत्री स्वच्छ भारत अभियानांतर्गत 2016 पासून 100 सदनिकेच्या वरील सर्व गृहप्रकल्पांना बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्या गृहप्रकल्पात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प करणे बंधनकारक केलेले होते. बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्या बांधकाम प्रकल्पामध्ये हे प्रकल्प उभे केलेले नसतील तर अशा बांधकाम प्रकल्पना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला मिळणार नाही.असा नियम असताना पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश बांधकाम व्यवसायिकांनी त्यांच्या बांधकाम प्रकल्पात असे प्रकल्प उभारले नसताना, किंवा ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशिन्स उपलब्ध करून दिलेल्या नसताना या सर्वांना महापालिकेच्या बांधकाम विभागाने डोळे झाकून बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिलेले आहेत.
त्यामुळे अशा बांधकाम प्रकल्पांना ज्या अधिकाऱ्यांनी बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिलेले आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच अशा सर्व बांधकाम व्यवसायिकांना आदेश देऊन सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प चालू करून देण्यास किंवा मशिन्स उपलब्ध करून देण्याचे आदेश आपण द्यावेत अन्यथा फेडरेशनच्या वतीने जनहित याचिका पालिकेच्या विरोधात दाखल करण्यात येईल असेही सांगळे यांनी म्हटले आहे.