पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासक कार्यकाळात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनसंवाद सभेचे आयोजन
-महापालिका आयुक्त श्री. राजेश पाटील यांनी केले क्षेत्रीय कार्यालयनिहाय कामकाजाचे नियोजन.
पिंपरी | लोकवार्ता-
महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत जलदगतीने निर्णय व्हावेत, या हेतूने क्षेत्रीय कार्यालयनिहाय ८ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ‘जनसंवाद’ या उपक्रमातून नागरिकांशी संवाद साधण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

पिंपरी पालिकेची मुदत संपुष्टात आल्यानंतर प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. पालिका आयुक्त राजेश पाटील हेच प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. ‘शहरातील नागरिक आणि प्रशासनात सुसंवाद राखण्यासाठी, तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. याकरिता आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी दर सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपस्थित राहून जनसंवाद सभेत सहभागी व्हावे, असे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. संबंधित क्षेत्रीय अधिकारी व सर्व विभागांचे अधिकारी या सभेस उपस्थित राहतील, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.