टीकेच्या भडिमारानंतर आयुक्त कार्यालयाबाहेर…!
आयुक्त सकाळी ९ वाजता येतात आणि रात्री ९ वाजेपर्यंत महापालिकेतेच बसून असतात

लोकवार्ता।प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेत रुजू झाल्यापासून केवळ कार्यालयात ठाण मांडून कामकाज करणारे आयुक्त राजेश पाटील यांच्यावर नगरसेवकांकडून टीकेची झोड उठली. त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले. आयुक्त सकाळी ९ वाजता येतात आणि रात्री ९ वाजेपर्यंत महापालिकेतेच बसून असतात. बाहेर कुठे जात नाहीत, परिस्थितीचा आढावा घेत नाहीत, अशी टीका नगरसेवकांकडून केली जात होती. अखेर या टीकेच्या भडीमारानंतर महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर पडू लागले असून त्यांनी प्रभागनिहाय आढावा बैठकीला सुरुवात केली आहे.

आयुक्त राजेश पाटील यांनी १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला कामाचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी गल्ली बोळात फिरणार तसेच गल्ली, प्रभागात फिरुन समस्यांचा आढावा घेतल्यानतर विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरविणार असल्याचे पदभार स्वीकारताना आयुक्तांनी सांगितले खरे, पण प्रत्यक्षात ते महापालिका कार्यालयाबाहेर पडतच नव्हते पदभार स्वीकारून आज त्यांना ४ महिने पूर्ण होत आहेत.
आयुक्त कार्यालयात सकाळी ९ वाजता येतात आणि रात्री ९ वाजेपर्यंत महापालिकेतेच बसून असतात जागेवर बसून आदेश सोडतात. प्रशासनाचे प्रमुखच जागेवर बसून काम करत असतील तर, बाकीचे कर्मचारी काय काम करणार?. आयुक्त बाहेर कुठे जात नाहीत. कोरोना कालावधीतही त्यांनी महापालिकेतच ठाण मांडले बाहेर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत नाहीत, असे आक्षेप नगरसेवक घेत होते.
काही दिवसांपूर्वी जम्बो सेंटरच्या नियोजनाबाबत आरोप झाल्यानंतर आयुक्तांनी एकवेळा जम्बोची पाहणी केली. त्यानंतर पुन्हा आयुक्त कार्यालयाबाहेर पडत नसल्याबाबत नगरसेवकांनी टीकेची झोड उठवली ही टीका खोडून काढण्यासाठी आयुक्त बाहेर पडू लागले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर आयुक्तानी आता प्रभागनिहाय बैठकाना सुरुवात केली आहे.
आयुक्त राजेश पाटील यांनी ‘अ’ प्रभागनतर आज ‘ब’ प्रभाग कार्यालयास भेट दिली. प्रभाग क्रमांक १६ आणि १७ मधील कामे तसेच विविध उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली प्रभाग स्तरावर चाललेली कामे, येथील समस्या, प्रश्न तसेच हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पाची सद्यस्थिती, पावसाळी कामे, कोरोना विषयक नियोजन, अतिक्रमण अशा विविध विषयावर बैठकीत चर्चा केली.