Pandharpur Wari 2022 : इंदापूरात पार पडले तुकोबारायांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण
लोकवार्ता: इंदापूरात तुकोबारायांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण पार पडले. विठुरायाच्या नामघोषात वैष्णवांची वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. विठ्ठल-ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत वैष्णवांच्या जनसागरात, लाल मातीच्या गोल रिंगणधारी पांढऱ्याशुभ्र कडांवरून मानाचे अश्व धावले.
उत्साही, आनंदमय वातावरणात रिंगण सोहळा आज इंदापूर शहरातील सौ कस्तुरा बाई श्रीपती कदम या विद्यालयात आश्र्वाचे गोल रिंगण पार पडले, रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. अनेक दिवसांचा पायी प्रवास, ऊन पावसाची तमा न बाळगता भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन वारकरी पांडुरगाच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या सर्व वारकरी, टाळकरी, माळकरी, वीणेकरी , तुळज्ञीवाल्या महिला पालखीभोवती हरिनामाचा गजर करीत रिंगणाभोवती उभ्या होत्या.

पांडुरंगा भेटायची आस, आतुरले नयन, विठ्ठल वाणी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकाराम ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करीत संत तुकाराममहाराज पालखी सोहळा निमगाव केतकी येथील मुक्काम आटोपून इंदापूर शहरात दाखल झाला सकाळी 11,30 वाजता रिंगण सुरू झाले. पालखी सोहळा रिंगणाच्या ठिकाणी हरिनामाच्या जयघोषात दाखल झाला. या वेळी गावात भक्तिमय वातावरणात रिंगणसोहळा सुरू झाला. सर्व दिडय़ांनी पालखीला प्रदक्षिणा घातली. यानंतर विठू नामाचा गजर करीत वारकरी खांद्यावर पताका घेऊन धावले. त्यांच्यामागे डोक्यावर हंडा व तुळशी घेऊन महिला वारकरी धावल्या नंतर विणेकरी धावले. शेवटी लक्ष लक्ष नयनांनी क्षण टिपावा असा क्षण आला. मानाचे अश्व धावण्यास सुरुवात झाली, एका पाठोपाठ एक असे अश्व धावले. अश्वधावण्याच्या अगोदर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या आश्वांची पूजा केली होती.