“फरार घोषित केलेले परमबीर सिंह अखेर मुंबई दाखल”
कांदिवली क्राईम ब्रांच पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंह हजर झाले आहेत.
मुंबई । लोकवार्ता-
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल झालेत. कांदिवली क्राईम ब्रांच पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंह हजर झाले आहेत. परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल चौकशी करणार आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर ते गायब होते. तसेच त्यांच्यावर काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते गायब असल्याने त्यांना फरार घोषित करण्यात आले होते. फरार घोषित करण्यात आल्यानंतर परमबीर सिंह आज मुंबईत दाखल झाले आहेत.

मागील काही महिन्यांपासून परमबीर सिंह हे तपास यंत्रणांसमोर येण्यासाठी टाळाटाळ करत होते. फौजदारी गुन्हे दाखल असल्याने अटकेच्या भीतीने गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते पोलिसांसमोर आल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, परमबीर सिंह यांनी दहशतवादी कसाब याचा मोबाईल लपवला होता, असा खळबळजनक आरोप निवृत्त एसीपी यांनी केला आहे. त्यांनी दहशतवाद्यांची मदत केल्याचाही दावा, निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी केला आहे.गोरेगाव येथे परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये सहकार्य करण्यासाठी ते आज कांदिवलीमधील क्राइम ब्रांचच्या युनीट 11मध्ये पोहोचल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.