निष्पाप रुग्णांचा होरपळून बळी जाण्याची पुनरावृत्ती होऊ नये
नगर दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी पार्थ पवार यांनी केली आहे.
पिंपरी।लोकवार्ता –
पिंपरी-चिंचवडमधील ११० रुग्णालयांचे फायर ऑडीटच झाले नसल्याची बातमी २ तारखेला प्रसिद्ध झाली. त्यावर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. देशात कोरोना रुग्णालयात आग लागून अनेकांचे बळी गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या, त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयांचे फायर ऑडीटच नाही, तर स्ट्रक्चरल ऑडीटही झाले असल्याची खात्री सबंधितांना करावी, असे सूचक ट्विट त्यांनी ३ तारखेला केले. त्यानंतर चार दिवसांतच नगर जिल्हा रुग्णालयात आग लागली. त्यावर या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे ट्विट त्यांनी केले.
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने मावळ तालुक्याला चांगलच झोडपून काढलाय त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून शेतकऱ्याचे झालेल्या भातपीक नुकसानीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कापणीला आलेले भातपीक भिजल्याने हवालदिल झालेल्या मावळातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यांना शासनाव्दारे मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर, ३० ऑक्टोबरच्या ट्विटमध्ये त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले होते.
शहरात अपूर्ण राहिलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे नागरिकांना गैरसोईंना सामोरे जावे लागते आहे. सत्ताधाऱ्यांनी सुनियोजित शहराचा कारभार बिघडवून सुरु केलेली कामे अपूर्ण ठेवली आहेत,असा हल्लाबोल करत त्यांनी, हीच का स्मार्टसिटी, अशी खोचक विचारणाही त्यांनी केली होती. एकूणच पिंपरी-चिंचवडमधील प्रश्नांविषयी ते सजग असल्याचे दिसून येत आहे. त्याविषयी सत्ताधाऱ्यांचे लक्ष ते वरचेवर वेधीत आहेत. वेळप्रसंगी त्यांची खरडपट्टीही काढत आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीवर व पक्षाच्या चाललेल्या तयारी व हालचालीवरही त्यांचे लक्ष आहे. या तयारीसाठी शरद पवारानंतर अजित पवार शहरात येणार आहेत. त्यानंतर पार्थ येतील,असे राष्ट्रवादीतूनच सांगण्यात आले.