“पाटील यांची पक्षश्रेष्ठींकडून झाडाझडती”
-राज्यातील भाजपच्या कामगिरीवर वरिष्ठ नाराज.
नवी दिल्ली ।लोकवार्ता-
जिल्हा परिषद, जिल्हा बँका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्रात पदरी पडलेल्या सातत्यपूर्ण अपयशाबद्दल भाजप श्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची चांगलीच झाडाझडती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.भाजप मुख्यालयात महाराष्ट्रातील भाजपच्या संघटनात्मक बांधणी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात दोन दिवसांपूर्वीच बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
भाजपला हुलकावणी देत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्र भाजप सैरभैर झाली आहे. नेमके यावरच पक्षश्रेष्ठींनी बोट ठेवल्याचे समजते. महाविकास आघाडीचे सरकार कधी पडेल किंवा कधी पाडता येईल याची वाट पाहण्यापेक्षा पक्ष संघटन मजबूत करण्याकडे आपले लक्ष द्या, महाविकास आघाडी सरकारविरोधात विरोधी पक्ष म्हणून काम करताना जनमानसात पक्षाची नकारात्मक प्रतिमा निर्माण झाल्याबद्दलदेखील पक्षश्रेष्ठींनी खडे बोल सुनावल्याचे समजते.

पाटील यांच्यावर नाराजी कशासाठी?
■ प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून चंद्रकांत पाटील यांनी संघटनेला कोणताही नवा कार्यक्रम व दिशा दिलेली नाही.
■ पाटील यांचा प्रवास फक्त कोल्हापूर, पुणे, मुंबई एवढ्यापुरताच मर्यादित आहे. अनेक जिल्ह्यांना त्यांनी भेटीही दिलेल्या नाहीत.
■ शंभर कोटी लसीकरणाबाबत राज्य भाजपकडून फारसे जनजागृती कार्यक्रम झालेले नाहीत.
■ पाटील यांच्यावरील नाराजीमुळेच गेल्या वेळी गृहमंत्री अमित शहा यांनी भेटीची वेळ नाकारली होती.