स्त्रियांना संरक्षण देणाऱ्या शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा
-राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शक्ती कायद्यावर केली सही.
मुंबई | लोकवार्ता-
स्त्रियांना अधिकाधिक संरक्षण देणाऱ्या शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शक्ती कायद्यावर आज सही केली आहे. खुद्द राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबतची माहिती विधानसभेत दिली आहे. शक्ती कायद्याच्या माध्यमातून महिलांना सर्वाधिक संरक्षण देणारं पहिलं राज्य ठरलं आहे. शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनीही याबाबतची माहिती दिली आहे. महिलांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी शक्ती फौजदारी कायदा अंमलात आणला आहे.

महिलांना सक्षमतेने लढता यावे यासाठी हा कायदा आहे. विशेष कोर्टाची निर्मिती व्हावी हा या कायद्या मागचा उद्देश आहे. त्यावर आज राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आहे. अशा प्रकारचा कायदा आणणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य असून महाविकास आघाडी सरकारही देशातील पहिलं सरकार आहे. महिलांची काळजी घेणारं हे सरकार आहे, असं सांगतानाच आता विशेष न्यायालये स्थापन करण्याचा कायदा लवकरच आणू, असं मनिषा कायंदे यांनी सांगितलं.