पवना धरणात केवळ २१ टक्के पाणीसाठा
लोकावार्ता: पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण मावळाची तहान भागविणाऱ्या पवना धरणात केवळ २१ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने येणाऱ्या काळात जर पाऊस झाला नाही तर पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे. यंदा पाऊस लांबणीवर गेल्याने पुणेकर हैराण झालेत.
पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. महापालिका सध्या 510 एमएलडी पाणी धरणातून उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरातील रहिवास्यांना पाणी पुरवठा केला जातो. यंदा उन्हाळा तीव्र होता. पाण्याचा वापर वाढल्याने या धरणातील पाणी झपाट्याने कमी झाले. जून महिन्याचा पंधरवाडा संपला तरी पावसाला सुरुवात झाली नाही.

पवना धरणात केवळ 21.82 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजअखेर 29.43 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पवना धरणात 7.61 टक्के पाणीसाठा कमी आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने स्॒टेंबरमध्येच धरण 100 टक्के भरले होते. यंदा जून महिन्याचा पंधरावाडा संपला तरी पाऊस आला नाही. त्यामुळे पाणी टंचाई होईल या चिंतेने पुणेकर हैराण झालेत.