गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी पैसे द्या
आजची पिढी म्हणजे उद्याचे भविष्य

लोकवार्ता।प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे काही ठोस उपाय योजना करून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मोबाईल रिचार्ज करण्यासाठी पैसे देण्यात यावे असे भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहरतर्फे आयुक्त राजेश पाटील व महापौर उषा ढोरे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस स्वीकृत सदस्य दिनेश यादव, सरचिटणीस जवाहर ढोरे व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज कोरोनामुळे बहुतांश नागरिकांची आर्थिक परिस्थिती ही खूप हलाकीची झालेली आहे तसेच हातावर पोट असणाऱ्यांना तर काही म्हणावी तशी आर्थिक आवक राहिलेली नाहीये. वरून सगळ्या शाळा ऑनलाईन क्लास घेत असल्यामुळे काही पालकांना परिस्थिती नसतांना विद्यार्थ्यांना मोबाईल देऊन रिचार्ज करावे लागत आहे. बरेचशे विद्यार्थ्यांना तर तेही शक्य नसल्यामुळे ते शिक्षणापासुन वंचित राहत आहेत. तस पाहिलं गेलं तर शिक्षण हा सर्वांचा मूलभूत हक्क व काळाची गरजच आहे, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आपण पालिकेतर्फे मदत देऊन त्यांना हातभार लावावा, अशी विनंती करण्यात आली.
आजची पिढी म्हणजे उद्याचे भविष्य, आणि देशाचे भविष्य हे खंबीर व शिक्षित असले पाहिजे या दृष्टीने आपण या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत म्हणुन पुढे यावे असं शहराध्यक्ष संकेत चोंधे म्हणाले.