इमारत दुरुस्तीसाठी मालकांना महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक; पावसाळ्यातील धोका टाळण्यासाठी देण्यात आल्या सूचना
लोकवार्ता : शहरातील जुन्या इमारतींना पावसाळ्यात धोका असल्याने महापालिकेने सूचना जरी केल्या आहेत. आता इमारत दुरुस्तीसाठी मालकांना महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
येत्या पावसाळ्यातील धोका टाळण्यासाठी तसेच अशा इमारतींत राहणाऱ्यांसह आसपासच्या व तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे असा धोका टाळण्यासाठी इमारत मालकांनी इमारतींची तपासणी तज्ज्ञ अभियंत्यांकडून करून घ्यावी व त्यांच्या सूचनांनुसार महापालिकेच्या परवानगीने वेळेत दुरुस्त करून घ्यावी, अशी सूचना महापालिका प्रशासनाने केली आहे.

अशा इमारतींची पाहणी करून त्याबाबत सर्व दक्षता घेतली जाणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेकडून संबंधितांना नोटिस देण्यात येत आहेत. आपल्या मालकीच्या इमारतींसंबंधी वेळोवेळी पाहणी करून ती इमारत सुरक्षित राखण्याची जबाबदारी महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २६५ अन्वये प्रत्येक इमारत मालकाची आहे. इमारतीचे जिने, छप्पर मोडकळीस आल्याचे आढळल्यास त्याबाबतची लेखी माहिती नागरिकांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील शहर अभियंता यांच्या कार्यालयात द्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.