येत्या पालखी सोहळ्यात सोयी सुविधांमध्ये कोणतीही कमतरता ठेऊ नका – आयुक्त राजेश पाटील
येत्या पालखी सोहळ्यात सोयी सुविधांमध्ये कोणतीही कमतरता ठेऊ नका असा निर्द्रेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. सर्व विभागांनी आपसात समन्वय ठेऊन पालखी सोहळ्याचे नियोजन करावे असंही ते म्हणाले
२१ जूनला जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शहरात आगमन होणार आहे. तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी २२ जूनला येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिकेच्या सर्व संबंधित विभागांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राजेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, 21 जून रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शहरात आगमन होत असून आकुर्डी येथे या सोहळ्याचा मुक्काम आहे.
मुक्कामाच्या ठिकाणी फिरती शौचालये, पिण्याचे पाणी अशा मुलभुत सुविधा उपलब्ध करून देताना त्यात कोठेही उणीव राहता कामा नये. ज्या शाळांमध्ये दिंड्यांचा मुक्काम आहे तेथे औषध फवारणी करावी. तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी. वारक-यांना आरोग्य तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र पथक नेमावे. कचरा संकलनासाठी जागोजागी डस्टबीन ठेवावे.
पालखी मार्गाची पाहणी करून अडथळा आणि धोकेदायक असणा-या वृक्षांची छाटणी करावी, खड्डे बुजवावेत, उघड्या चेंबर्सना झाकण बसवावे आदी निर्देश आयुक्त पाटील यांनी यावेळी दिले. पालखी सोबत महापालिका दरवर्षी अग्निशमन वाहन देत असते. पालखी सोहळा प्रमुखांनी यावर्षी केलेल्या मागणीनुसार वैद्यकीय पथक आणि औषध व्यवस्थेसह पालखीसोबत महापालिकेच्या वतीने रुग्णवाहिका देण्यात येणार आहे असे आयुक्त पाटील यांनी यावेळी सांगितले. प्लॅस्टीक मुक्तीचा संदेश देण्यासाठी दिंड्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहशहर अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवणे, संजय खाबडे, संदेश चव्हाण, संजय कुलकर्णी, उपआयुक्त संदीप खोत, सचिन ढोले, विठ्ठल जोशी, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, कार्यकारी अभियंता प्रविण घोडे, विजय काळे, बापू गायकवाड, आबासाहेब ढवळे, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, अण्णा बोदडे, विजयकुमार थोरात आदी उपस्थित होते.