पावसाळ्यापूर्वी महापालिकेने मागवली धोकादायक इमारतींची माहिती

लोकवार्ता : पावसाळ्यापूर्वी महापालिकेने धोकादायक इमारतींची माहिती मागवली आहे. पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा इमारतींचे महापालिका प्रशासनाकडून प्रभाग निहाय सर्वेक्षण करण्याची सूचना देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गतवर्षी 61 इमारती धोकादायक होत्या. त्यांना महापालिकेने नोटीसाही दिल्या होत्या. त्यातील ज्या इमारतींची दुरुस्ती शक्य आहे त्यांची त्वरीत दुरुस्ती करण्यास सांगण्यात येणार आहे.
दुरुस्ती न करता येणाऱ्या इमारती स्वत: नागरिकांनी पाडून टाकाव्या, असेही सांगण्यात येणार आहे. त्यानंतरही धोकादायक इमारत मालकांनी इमारती स्वतः हून न पाडल्यास त्यांना नोटीस देण्यात येणार आहेत. इमारत कोसळून जीवित किंवा वित्तहानी झाल्यास इमारत मालकांना जबाबदार धरण्यात येणार आहे.