लोक मला दारु पिण्यासाठी आग्रह करतात पण – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश
कृष्णप्रकाश यांच्या कामाच्या व्यापामुळे त्यांना यायला उशीर होत होता

लोकवार्ता । प्रतिनिधी
पिंपरी : जागतिक अमली पदार्थ व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त मुक्तांगणतर्फे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ऑनलाईन मरेथॉनचे उद्घाटन पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते झाले. यावेळी कृष्णप्रकाश यांनी मुक्तांगणला दिलेल्या भेटीविषयी मुक्तांगणच्या मुक्ता पुणतांबेकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.

पुणतांबेकर यांनी आपल्या पोस्ट मध्ये असे म्हटले आहे की, कृष्णप्रकाश यांच्या कामाच्या व्यापामुळे त्यांना यायला उशीर होत होता. पण कितीही उशीर झाला तरी ते नक्की येतील असे त्यांनी आश्वासन दिले होते. मुक्तांगणच्या आवारात जेव्हा ते गाडीतून उतरले तेव्हाच त्यांच्यातल्या सकारात्मक ऊर्जेचा आम्हाला अनुभव आला. रुग्णमित्रांशी अतिशय मोकळेपणाने गप्पा मारल्या. कविता, छोट्या कथा, अनुभव सांगितले.

व्यायामामुळे चांगले हार्मोन्स सिक्रीट होतात. म्हणून व्यसनमुक्त राहण्यासाठी फिटनेस महत्त्वाचा आहे ते सुद्धा त्यांनी सांगितले.ते स्वतः आयर्न मॅन आणि अल्ट्रा मॅन आहेत. मुक्तांगणच्या व्यसनमुक्तीच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. त्यांची ही थोड्या वेळाची भेट सुद्धा अतिशय उत्साह वाढवणारी होती, असे ही पुणतांबेकर यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.
यावेळी कृष्णप्रकाश यांनी संवाद साधला त्यावेळी त्यावेळी त्यांनी त्यांचे काही अनुभव सांगितले. ते म्हणाले की ‘मला पार्टीला बोलावल्यावर लोक दारू प्यायचा आग्रह करतात. मी पीत नाही’, सांगितले तरीसुद्धा ‘थोडे तरी प्या, सोशलायझेशनसाठी आवश्यक आहे’, असे म्हणतात. मी त्यांना म्हणतो, ‘तुम्ही माझ्या चांगल्या सवयीचे अनुकरण करत नाही, तर मी तुमच्या वाईट सवयीचे अनुकरण का करू? ‘आणि मी कधीच त्यांच्या आग्रहाला बळी पडत नाही. असेही त्यांनी सांगितले.