महापालिका करणार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार; १० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचं आवाहन
लोकवार्ता: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा महापालिका सत्कार करणार आहे. सन २०२१-२०२२ मध्ये झालेल्या विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त आणि सहभागी झालेल्या शहरातील खेळाडूंचा महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. अशा खेळाडूंचा महापालिकेच्या संकेतस्थळावरून अर्जाची प्रत डाउनलोड करून हा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह १० जून पर्यंत सादर करावा लागणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ठाकणे यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड शहराला क्रीडाभूमी म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने शहरात विविध क्रीडासंबंधी उपक्रम राबिण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने शहरात नुकतेच महापालिका आणि सीएमई यांच्या संयुक्त विद्यमाने रोईंग प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात आली असून याठिकाणी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना रोईंग खेळाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मागील वर्षी महापालिकेच्या वतीने नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास मैदानावर राष्ट्रीय पातळीवर हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे हॉकी इंडियाच्या वतीने महापालिकेला आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी देऊ केली आहे.
खेलो इंडिया, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित आंतरविद्यापीठ (राष्ट्रीय) स्तरावर सहभागी झालेले शहरातीत विद्यार्थी, खेळाडू तसेच क्रीडा संघटनेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद आंतरराष्ट्रीय विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त व सहभागी झालेल्या शहरातील खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राविण्यप्राप्त आणि सहभागी खेळाडूंनी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून अर्ज भरावयाचा आहे.
या अर्जासोबत खेळाडूने सन २०२१-२२ व २०२२-२३ मधील खेळाच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत, आधार कार्डाची छायांकित प्रत, रहिवासी पुराव्यासाठी खेळाडूंच्या नावासह रेशनकार्डाची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्र जोडणे बंधनकारक असेल. संबंधितानी अर्ज दि. ७ जून ते १० जून २०२२ पर्यंत क्रीडा विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, स.नं. १६५ / २.१५ प्रेमलोक, १ला मजला, प्रेमलोक पार्क बस स्टॉप समोर चिंचवड पुणे ४११०३३ येथे सादर करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.