“पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांनी सांगवीतील एसटी कर्मचाऱ्यांना केले जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप”
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे
पिंपरी | लोकवार्ता-
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. आधीच तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या या कामगारांनी संपाचे हत्यार उपसल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. बिकट परिस्थितीत असलेल्या या एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवडच्या महापौर धावून गेल्या आहेत. महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी सांगवी येथील एसटी वसाहतीमध्ये हलाखीत राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना गुरूवारी (दि. २५) अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मायेचा ओलावा निर्माण होईल अशी दिलदार कृती केली आहे.
सव्वा दोन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी विराजमान झालेल्या माई ढोरे या आता अवघ्या शहराच्या माई झाल्या आहेत. त्यांनी कोरोना काळात शहरवासीयांसाठी एखाद्या पुरूषाला लाजवेल एवढे काम केले आहे. कोरोनाच्या संकटात शहरातील नागरिकांच्या मदतीला धावून जाण्यासोबतच प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी माई ढोरे यांनी कष्ट घेतले आहेत. कोरोना योद्ध्यांना कोणाताही त्रास होणार नाही याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. त्यामुळे शहरात कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आले.

शहरात कोणीही अडचणीत असला तर महापौर म्हणून माई ढोरे या आईच्या नात्याने मदतीला धावून जातात. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली त्या नेहमी समाजहितासाठी तत्पर असतात. आताही त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या मदतीला धावून गेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपामुळे महाराष्ट्रात लालपरी ठप्प झाली आहे. एसटी कर्मचारी आपल्या न्याय्य मागण्यासाठी हे आंदोलन करत आहेत. आधीच तुटपुंज्या वेतनावर काम करणारे हे कर्मचारी बेमुदत आंदोलन करत असल्याने त्यांच्या कुटुंबियांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे. ही बाब लक्षात घेऊन महापौर माई ढोरे यांनी सांगवी येथे असलेल्या एसटी वसाहतीत राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावल्या आहेत.
महापौर माई ढोरे यांनी एसटी वसाहतीतील एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना गुरूवारी अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत दिली आहे. त्यांच्या या मदतीमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. महापौर माई ढोरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रती मायेचा ओलावा निर्माण होईल, अशी दिलदार कृती करून खरंच त्या शहराच्या माई आहेत, हे सिद्ध केले आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची वर्कशॉपमध्ये भेट घेऊन त्यांच्या अडचणी व समस्या त्यांनी जाणून घेतल्या. एसटी आगारातील प्रमुखाची भेट घेतली. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांचे निलंबन न करता लोकशाही मार्गाने आंदोलन करू द्या, अशी मागणी त्यांनी आगार प्रमुखांकडे केली.
यावेळी जवाहर ढोरे, गणेश काची, साहिल पाचपुते, समीर पठाण, अमेय पोरे, राहुल गवारी, राहुल बांदल, ऋषभ काची, केयूर चव्हाण तसेच जे. डी. ग्रुप व सांगवी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.