पिंपरी चिंचवड महापालिका अर्थसंकल्प सादर, मात्र राष्ट्रवादीचे नगरसेवक अनुपस्थित
-अर्थसंकल्पात राष्ट्रवादीचे एकही नगरसेवक व नेते उपस्थित नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे .
पिंपरी | लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड महापालिकेचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा मूळ ४ हजार ९६१ कोटी ६५ लाख रूपये आणि केंद्र व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनांसह ६ हजार ४९७ कोटी २ लाख रूपयांचा अर्थसंकल्प महापालिका अति आयुक्त विकास ढाकणे यांनी स्थायी समितीला आज (दि. १८) सादर केला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती नितीन लांडगे हे होते. पिंपरी चिंचवड महापालिकेचे हे ४० वे अंदाजपत्रक आहे.
सभापती नितीन लांडगे यांनी दि. २३ फेब्रुवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत अर्थसंकल्पाच्या अभ्यासाकरिता सभा तहकूब केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सन २०२२-२३ चे अंदाजपत्रक सादर केले असून महापालिकेचे हे ४० वे अंदाजपत्रक आहे. या आर्थिक वर्षात र.रु.४९६१.६२ कोटी (शिल्लकेसह) इतकी रक्कम जमा होईल हे अपेक्षित धरुन अंदाजपत्रक मा.स्थायी समिती मार्फत महापालिका सभेपुढे सादर केले आहे. १ हजार ५३५ कोटी ३७ लाख रूपयांच्य केंद्र व राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांच्या समावेशासह एकूण ६ हजार ४९७ कोटी २ लाख रूपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि स्थानिक नेत्यांनी अर्थसंकल्प सादर केला जात असताना त्याकडे पाठ फिरवली. यामुळे सुशिक्षित पिंपरी चिंचवडकरांकडून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या बेजबाबदारपणावर संताप व्यक्त केला जात आहे.शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला अर्थसंकल्प सादर होत असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि नेत्यांनी पाठ फिरवली. आगामी काळात हेच राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी अर्थसंकल्प मांडताना विश्वासात घेतले नाही, म्हणून गळा काढतील, असा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.