पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बदली ; त्यांच्याजागी अंकुश शिंदे यांची नियुक्ती
-कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली!
पिंपरी । लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड मध्ये आपल्या कामामुळे प्रसिद्ध असलेले पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बदली करण्यात आली आहे. आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली झाल्यानंतर अंकुश शिंदे यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार नवे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा आज पदभार स्वीकारला. अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केले. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सध्या माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. ते याअगोदर मुंबईमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा येथे कार्यरत होते.

त्यांनी आज पोलीस आयुक्तालयाची सूत्रे हातात घेतली. कृष्ण प्रकाश हे नेहमी प्रकाशझोतात राहण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळेच त्यांचे हे प्रकाश झोतात राहणं भोवल्याची चर्चा पोलीस आयुक्तालयात आहे. 2 सप्टेंबर 2020 रोजी कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच त्यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवडमधील कारकीर्द काहीशी वादात तर चर्चेची ठरली.